नवी दिल्ली – जगभरात अत्यंत महत्त्वाचे बदल होत असताना, भारत आणि इस्रायलच्या संबंधांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण सहकार्य पुढच्या काही दशकात नवे टप्पे गाठल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारत व इस्रायलमधील राजनैतिक संबंधांना ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून पंतप्रधानांनी हा संदेश दिला आहे.
यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. तर इस्रायल आपल्या स्थापनेचे ७५ वे वर्ष पुढच्या वर्षी साजरे करील. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या राजनैतिक संबंधांना आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे सहकार्य नव्या उंचीवर नेण्याची यासारखी उत्तम संधी नाही, असे सांगून पंतप्रधानांनी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचवेळी भारत आणि इस्रायलचे राजनैतिक सहकार्य ३० वर्षांपूर्वी प्रस्थापित झालेले असले, तरी दोन्ही देशांच्या सभ्यतांमधल्या सहकार्याला कित्येक शतकांचा इतिहास लाभलेला आहे, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.
भारत व इस्रायलच्या जनतेमध्ये फार आधीपासून मैत्रीपूर्ण सहकार्य होते. कित्येक शतकांपासून भारतात ज्यूधर्मियांचे वास्तव्य होते आणि त्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये योगदान दिलेले आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत व इस्रायलच्या मैत्रीला फार मोठी परंपरा लाभलेली आहे, याची आठवण करून दिली. दोन्ही देश आपले हे मैत्रिपूर्ण संबंध अधिकच विकसित करतील व यामुळे हे सहकार्य अधिकच फलदायी ठरेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.
एकमेकांपासून सुमारे चार हजार किलोमीटर इतक्या भौगोलिक अंतरावर असलेले भारत व इस्रायल अनेक क्षेत्रांमध्ये परस्परांना सहकार्य करीत आहेत. यामध्ये जलव्यवस्थापन, कृषी व संशोधन आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचा समावेश असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर व इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी म्हटले आहे. तर इस्रायलचे भारतातील राजदूत नोर गिलॉन यांनी यांनी दोन्ही देशांच्या पुढच्या ३० वर्षाच्या सहकार्याचा आराखडा मांडण्याची आवश्यकता व्यक्त केली. पुढच्या काळात भारत व इस्रायलचे सहकार्य अधिकाधिक विकसित आणि फक्त विकसितच होत राहिल, असे गिलॉन यांनी नुकतेच म्हटले होते.