युएई, सौदीचे युरोपिय देशांशी संरक्षण करार

तेहरान/अबु धाबी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीला (युएई) शस्त्रविक्री करण्यावर बंदी जाहीर केली आहे. यामुळे या दोन्ही अरब देशांच्या शस्त्रसज्जतेवर परिणाम होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण अमेरिकेने बंदी लादली असली तरी जर्मनी, बेलारूस यांच्यासारख्या युरोपिय देशांबरोबर सौदी व युएईने संरक्षण साहित्यांच्या व्यवहारांबाबत नवे करार केले आहेत. युएईने तर थेट इस्रायलमध्ये आपल्या शस्त्रनिर्मिती कंपनीचे कार्यालय सुरू केले आहे. यामुळे खवळलेल्या इराणने अरब देशांच्या शस्त्रास्त्र व्यवहारांमागे अमेरिकाच असल्याचा आरोप सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून युएईमध्ये ‘इंटरनॅशनल डिफेन्स एक्झिबिशेन २०२१’ (आयडेक्स) सुरू होता. कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर, यंदाच्या आयडेक्स’मध्ये परदेशी कंपन्यांची गर्दी नसेल. यामुळे अरब देशांच्या शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीवर परिणाम होईल, असे बोलले जात होते. तरी देखील यंदाच्या ‘आयडेक्स’मध्ये १३०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निर्बंध जाहीर केले असले तरीही लॉकहिड मार्टिन, बोईंगसारख्या अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्यांची दालने देखील या ठिकाणी मांडण्यात आली होती.

अबु धाबीतील आयडेक्सच्या पाच दिवसांच्या प्रदर्शनात युएईने तब्बल साडे चार अब्ज डॉलर्सच्या करारांवर स्वाक्षरी केली. यात युएईच्या ‘एज ग्रुप’ या कंपनीच्या हवाई सुरक्षा यंत्रणा ‘स्कायनाईट’चाही समावेश आहे. स्कायनाईटच्या खरेेदीसाठी जर्मनीने स्वारस्य दाखविले असून जर्मनीच्या ‘र्‍हिनमेटल एजी’ या आघाडीच्या कंपनीने एज ग्रुपबरोबर महत्त्वाचा करार केला. लढाऊ विमाने, ड्रोन्स यांच्याबरोबर १० किलोमीटरच्या अंतरातील रॉकेट्स, मॉर्टर्स यांना भेदण्यासाठी ही यंत्रणा सहाय्य ठरेल, असा दावा युएईच्या अधिकार्‍यांनी केला.

त्याचबरोबर चिलखती वाहनांसाठी प्रसिद्ध असलेल्या युएईस्थित पॅरामाऊंट ग्रूपने इस्रायलमध्ये कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली. युएई व इस्रायलमध्ये पार पडलेल्या अब्राहम कराराअंतर्गत हे पाऊल टाकले जात असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलने विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. यामुळे इस्रायली कंपन्या आयडेक्समध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत. पण यामुळे युएई व इस्रायलमध्ये प्रस्थापित होत असलेल्या सहकार्यावर त्याचा परिणाम झालेला नाही.

या व्यतिरिक्त युएई आणि सौदी अरेबियामध्येही लष्करी वाहनांच्या निर्मितीसंबंधी मोठे करार झाले आहेत. युएईतील ‘एनआयएमआर’ने सौदीच्या ‘सामी’ कंपनीबरोबर यासंबंधी करार केला आहे. तर आयडेक्सच्या निमित्ताने सौदीच्या ‘सामी’ने बेलारूसच्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केल्याची माहिती समोर येत आहे. सौदीच्या मुखपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ७० हून अधिक स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सौदीच्या संरक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी परवाना मिळाला आहे. यामुळे सौदीच्या संरक्षण क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा दावा केला जातो.

दरम्यान, ‘आयडेक्स २१’च्या निमित्ताने समोर येणार्‍या या माहितीमुळे इराणची कमालीची अस्वस्थता वाढली आहे. पाश्‍चिमात्य देशांकडून सौदी, युएईला मिळणार्‍या या प्रतिसादाला अमेरिकाच जबाबदार असल्याचा ठपका इराणच्या वृत्तवाहिनीने ठेवला. अमेरिकेतील एका विश्‍लेषकाचा हवाला देऊन इराणी वृत्तवाहिनीने ही टीका केली आहे.

leave a reply