अमेरिका चीनच्या झिंजियांगमधील उत्पादनांवर बंदी टाकणार

वॉशिंग्टन – झिंजियांगमधील उघूरवंशियांचा संहार घडविणाऱ्या चीनच्या विरोधात अमेरिका मोठा निर्णय घेऊ शकते. अमेरिकेचे कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभाग चीनच्या झिंजियांगमध्ये तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर बंदी टाकू शकते, अशी माहिती अमेरिकन माध्यमे देत आहेत. तर अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर देण्याची तयारी चीनने केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात ‘उघूर फोर्सड् लेबर प्रिव्हेंशन ॲक्ट’ या कायदा पारित केला होता. यानुसार मानवाधिकारांचे उल्लंघन करून चीन उघूरवंशियांकडून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांना अमेरिकन बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यानुसार चिनी उत्पादनांवर बंदी टाकण्याची तयारी बायडेन प्रशासनाने केल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे. याबाबत अमेरिका आपल्या मित्रदेशांशी चर्चा करून सहकार्य मिळविणार असल्याचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. पण अमेरिकेने चिनी उत्पादनांवर बंदी टाकली, तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, असा इशारा चीनची माध्यमे देत आहेत. अमेरिकेच्या उत्पादनांवरही अशी कारवाई केली जाईल, असे संकेत या माध्यमांनी दिले आहेत. दरम्यान, चीनने झिंजियांगमधील उघूरवंशिय व इतर अल्पसंख्यांकांवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय संघटनांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

leave a reply