युरोपची इंधनाची गरज अमेरिका पूर्ण करु शकत नाही

- ब्रिटीश दैनिकाचा दावा

इंधनाची गरजवॉशिंग्टन/ब्रुसेल्स – रशियन इंधनाच्या आयातीवर निर्बंध लादून रशियाला हादरा देण्याचे मनसुबे आखणाऱ्या युरोपसमोरील इंधन संकट अधिकच तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिका, आखात तसेच आफ्रिकी देशांच्या जोरावर रशियन इंधनाला पर्याय देता येईल, असे दावे युरोपिय नेते व तज्ज्ञांकडून करण्यात येत होते. मात्र आखाती व आफ्रिकी देशांनी यासाठी अनेक वर्षे लागतील, असे सांगून युरोपचा दबाव झुगारला होता. त्यामुळे सर्व मदार अमेरिकेवरच असताना अमेरिकेतील इंधन उत्पादकांनी युरोपच्या गरजा पूर्ण करण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक ‘द फायनान्शिअल टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिले.

रशिया हा युरोपचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार म्हणून ओळखण्यात येतो. युरोपिय इंधनाच्या एकूण गरजांपैकी 30 टक्क्यांहून अधिक गरज रशियाकडून पूर्ण करण्यात येते. सध्याच्या आकडेवारीनुसार युरोपिय देश रशियाकडून दररोज 35 लाख बॅरल्स कच्चे तेल व पेोलियम उत्पादन आयात करतात. तर 2021 साली रशियाने युरोपिय देशांना 150 अब्ज घनमीटरहून अधिक नैसर्गिक इंधनवायू निर्यात केला होता. इंधनाच्या जागतिक बाजारपेठेत रशिया हा आघाडीच्या उत्पादकांपैकी एक असून या बाजारपेठेतील रशियाचा वाटा 10 टक्क्यांहून अधिक आहे.

इंधनाची गरजरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या युरोपिय देशांनी रशियाकडून इंधन आयात कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियन इंधनाची आयात 80 टक्क्यांपर्यंत घटविण्यात येणार आहे. मात्र रशियन इंधन बंद झाल्यानंतर त्याला सक्षम पर्याय शोधण्यात युरोपिय देश अपयशी ठरले आहेत. कच्चे तेल तसेच नैसर्गिक इंधनवायूची आयात वाढविण्यासाठी युरोपिय देशांनी आखाती देश तसेच आफ्रिका खंडातील देशांबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र या देशांनी आपण रशियाला पर्याय देऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे युरोप अमेरिकेच्या निर्यातीवर अवलंबून आहे.

इंधनाची गरजगेल्या वर्षापासून अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी इंधननिर्यातीसाठी युरोपिय देशांबरोबर करार केले आहेत. अमेरिकेची जहाजे युरोपिय बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. अमेरिकेतील इंधनवायूच्या उत्पादनापैकी 70 टक्क्यांहून अधिक इंधनवायू अमेरिकेने युरोपला निर्यात केला आहे. तर 2022 सालच्या पहिल्या पाच महिन्यात युरोपने 21 कोटी बॅरल्सहून अधिक कच्चे तेल अमेरिकेकडून आयात केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेकडून युरोपला होणारी इंधननिर्यात दुपटीहून अधिक प्रमाणात वाढली आहे. मात्र निर्यात वाढली असली तरी इंधनाचे उत्पादन त्याप्रमाणात वाढले नसल्याचे अमेरिकेतील कंपन्या व विश्लेषकांचे म्हणणे आहे. ‘शेल’ इंधनाच्या क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी या क्षेत्राला सरकारकडून विशेष सहाय्य मिळत नसल्याची टीका केली आहे. ‘सध्या अमेरिकेत जे काही उत्पादन होते आहे त्यात मोठी भर पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कच्चे तेल अथवा इंधनवायूच्या बाबतीत अमेरिका आपली सुटका करेल, असे युरोपिय देशांनी समजू नये’, असा इशाराच अमेरिकी गुंतवणुकदार विल वॅन्लोव्ह यांनी दिला.

दरम्यान, ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी जर्मनीने रशियन इंधनकंपनी ‘रोझनेफ्ट’चे तीन उपक्रम ताब्यात घेतल्याची घोषणा केली. या कंपन्यांवर आता सरकारच्या ‘फेडरल नेटवर्क एजन्सी’ची मालकी राहणार असून मूळ रशियन कंपनीला कोणत्याही प्रकारे आदेश देता येणार नाहीत, असे जर्मन सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

leave a reply