शांघायमधील लॉकडाऊनवरून अमेरिका व चीनमध्ये खडाजंगी

शांघाय/वॉशिंग्टन – चीनने शांघायमध्ये लादलेला लॉकडाऊन अमेरिका व चीनमधील नव्या तणावाचे कारण ठरला आहे. शांघायमधील लॉकडाऊनदरम्यान चिनी यंत्रणा अनियंत्रित व अमर्याद निर्बंध लादत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तर अमेरिका तथ्यहीन वक्तव्ये करीत असल्याचे प्रत्युत्तर चीनने दिले आहे.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शांघायमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही शांघायमधील स्थितीत बदल झाला नसून उलट रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढते आहे. गेले काही दिवस शांघायमध्ये दररोज १० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. शनिवारी रुग्णसंख्या २३ हजारांवर गेल्याचे समोर आले. रुग्णसंख्या वाढत असतानाच शांघायच्या नागरिकांसह परदेशी नागरिक, अधिकारी व कर्मचार्‍यांना पुरेसे अन्नधान्य, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

शांघायमधील लॉकडाऊनअमेरिकेने याची दखल घेऊन आपल्या नागरिकांना चीनला भेट देऊ नये, असा सल्ला दिला आहे. चीनच्या यंत्रणा ‘झीरो कोविड पॉलिसी’अंतर्गत अनियंत्रित निर्बंध लादत असून अमेरिकी नागरिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सांगण्यात आले. शांघायमधील अमेरिकेच्या राजनैतिक कार्यालयालाही निर्बंधांचा फटका असून अमेरिकेचे चीनमधील राजदूत निकोलस बर्न्स यांनी चिनी अधिकार्‍यांसमोर यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला आहे.

त्याचवेळी राजनैतिक कार्यालयात काम करणार्‍या व अत्यावश्यक नसलेल्या कर्मचार्‍यांनी कार्यालयातून बाहेर पडावे, अशी सूचनाही अमेरिकी यंत्रणांनी केली आहे. कोरोना उपाययोजनांवर नाराजी व्यक्त करणार्‍या अमेरिकेच्या या भूमिकेवर चीनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘अमेरिकेने केलेल्या तथ्यहीन आरोपांना आमचा ठाम विरोध आहे. अमेरिकेने चीनच्या कोरोनाविरोधी उपाययोजनांवर व्यक्त केलेल्या नाराजीचा आम्ही निषेध नोंदवित आहोत’, असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी बजावले.

शांघायमधील लॉकडाऊनचीनच्या ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात यापूर्वी विविध देशांमधील तज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांनी टीकास्त्र सोडले होते. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही चीनचे हे धोरण अपयशी ठरल्याचे दाखवून दिले होते. मात्र अमेरिकेच्या सत्ताधारी बायडेन प्रशासनाने चीनच्या धोरणांवर उघड नाराजी दाखविण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. अमेरिकेच्या या नाराजीने चीन चांगलाच अस्वस्थ झाल्याचे चिनी प्रवक्त्यांच्या प्रत्युत्तरावरून दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमधील अधिकार्‍यांनीच कोरोना साथीविरोधात पुरेशी तयारी केलेली नाही व त्याचे परिणाम दिसत असल्याची कबुली दिली होती. कोरोनाविरोधातील उपाययोजना ‘टोटल डिझास्टर’ असल्याची नाराजी स्थानिक उद्योजक व सामान्य नागरिकांनीही व्यक्त केली होती. मात्र चीनच्या सत्ताधारी राजवटीने ही नाराजी दडपण्याचे प्रयत्न केले. पण अमेरिकेच्या वक्तव्यांमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने चीनच्या सत्ताधार्‍यांची कोंडी झाल्याचे दिसत आहे.

leave a reply