बाली – चीन हा अमेरिकेचा घातक प्रतिस्पर्धी असल्याचे दावे ‘पेंटॅगॉन’ व ‘सीआयए’च्या अहवालातून करण्यात येत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी इंडोनेशियात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ‘जी२० समिट’च्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्राध्यक्षांसह उच्चस्तरिय शिष्टमंडळात तब्बल तीन तासांहून अधिक चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी परस्परांमधील स्पर्धा योग्य पद्धतीने हाताळून संवादाचे मार्ग खुले ठेवायला हवेत, अशी भूमिका बायडेन यांनी मांडल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर असताना त्यांनी चीनविरोधात आक्रमक व्यापारयुद्ध छेडले होते. त्यानंतर तैवान व कोरोनाच्या साथीसह इतर अनेक मुद्यांवर ट्रम्प यांनी चीनला जबर धक्का देणारे निर्णय घेतले होते. अमेरिकेपाठोपाठ युरोपिय देशांसह इंडो-पॅसिफिकमधील प्रमुख देशांनीही चीनला उघड आव्हान देण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या कारवायांविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने ट्रम्प यांच्यानंतर सूत्रे स्वीकारलेल्या बायडेन यांनाही चीनसंदर्भातील कडक धोरण कायम ठेवणे भाग पडले होते. अमेरिकेच्या धोरणातील बदल व चीनमध्ये जिनपिंग यांची वाढती एकाधिकारशाही यामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध रसातळाला गेल्याचे सांगण्यात येते.
रशिया-युक्रेन युद्धात चीनने रशियाला समर्थन दिल्यामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देश अधिकच नाराज झाले आहेत. अमेरिका तसेच युरोपातील अनेक यंत्रणा चीन हाच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याचे दावे करणारे अहवाल प्रसिद्ध करीत आहेत. मात्र त्याचवेळी या देशांकडून चीनबरोबर असलेले आर्थिक व व्यापारी संबंध वाढवून संवाद कायम ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी युरोपातील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी नुकताच चीनचा दौरा केला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही जिनपिंग यांची भेट घेऊन तीन तासांहून अधिक काळ चर्चा केल्याचे समोर येत आहे.
दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान झालेल्या चर्चेत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेकडून परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन, अर्थमंत्री जेनेट येलेन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन व अमेरिकेचे चीनमधील राजदूत निकोलस बर्न्स यांचा समावेश होता. तर चीनकडून परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यासह जिनपिंग यांनी नव्याने नियुक्त केलेल्या पॉलिटब्युरोतील तीन वरिष्ठ नेते हजर होते. भेटीत द्विपक्षीय संबंधांसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली.
बायडेन यांनी या चर्चेत झिंजियांग, तिबेट व हाँगकाँगसह तैवानचा मुद्दा उपस्थित केल्याचे दावे व्हाईट हाऊसने ठोकले आहेत खरे. मात्र त्याची तीव्रता चीनला खटकण्याइतकीही नव्हती, असे स्पष्ट होत आहे. तसेच युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर होऊ नये, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत असल्याची माहितीही अमेरिकेने दिली.
गेल्या महिन्यात जिनपिंग यांनी स्वतःला कम्युनिस्ट पार्टीसह चीनचे सर्वेसर्वा म्हणून घोषित केले होते. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीन अधिकाधिक आक्रमक व एकतंत्री राजवटीकडे झुकेल आणि चीनच्या युद्धखोर महत्त्वाकांक्षांना रोखता येणार नाही, असा सूर व्यक्त करण्यात आला होता. चीनच्या महत्त्वाकांक्षांना पायबंद घालण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, असे दावेही करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात असे दावे करणारे देश जिनपिंग यांच्या राजवटीबरोवर सहकार्य व संवाद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या भेटीतून दिसून येत आहे.