कॅनबेरा/बीजिंग – ‘रशियाचे युक्रेनवरील हल्ले हे आपल्यासाठी संकेत आहेत. रशियाप्रमाणे चीन देखील तैवानवर हल्ला चढवू शकतो. त्यामुळे आपण हलगर्जीपणा करून चालणार नाही. अमेरिकेला कुठल्याही क्षणी, कुठल्याही परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका व चीनमध्येही युद्ध भडकू शकते’, असा इशारा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी दिला. त्यांच्या या इशार्यामुळे चीन चांगलाच खवळला आहे. तैवान आणि युक्रेनमध्ये साम्य शोधण्याचा प्रयत्न झालाच तर नवे संकट उद्भवेल, असे चीनने धमकावले आहे.
ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी गेल्या आठवड्यात सहा दिवसांचा ऑस्ट्रेलिया दौरा केला. इंडो-पॅसिफिक प्रमुखांच्या या ऑस्ट्रेलिया दौर्याबाबत गोपनीयता राखण्यात आली होती. ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीनंतर या दौर्याची माहिती उघड झाली. ऑस्ट्रेलियन लष्कराला अमेरिकेच्या सामरिक योजनेत सामील करुन घेण्यासाठी ऍडमिरल ऍक्विलिनो यांचा हा दौरा आखलेला होता, असे सांगितले जाते.
दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इंडो-पॅसिफिकच्या प्रमुखांनी चीनकडून गंभीर धोका असल्यामुळे अमेरिका या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाली करीत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी चीनने चलाखी दाखवून तैवानच्या क्षेत्रात सागरी, हवाई सामर्थ्यात वाढ केल्याचा दावा ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी केला. सध्या चीन आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करीत असून येत्या दशकभरात चीन हजाराहून अधिक अण्वस्त्रांनी सज्ज असेल, असे ऍडमिरल ऍक्विलिनो म्हणाले.
अमेरिकेचे इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख तैवानच्या मुद्यावरुन चीनबरोबरील युद्धाचा इशारा देत असताना, अमेरिका आणि फिलिपाईन्सच्या लष्कराचा मोठा सराव सुरू झाला आहे. तैवानच्या आखाताजवळ सुरू झालेल्या ‘बालिकतान’ वार्षिक सरावात अमेरिका व फिलिपाईन्सच्या जवळपास नऊ हजार जवानांनी सहभाग घेतला आहे. तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ या सरावाचे आयोजन करून अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने चीनला इशारा दिल्याचा दावा केला जातो.
दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, अशी चिंता ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी याआधीही व्यक्त केली होती. पण यावेळी ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी तैवानची तुलना युक्रेनशी केल्यामुळे चीन खवळला आहे. युक्रेन हा स्वतंत्र देश असून तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी केला. त्यामुळे युक्रेनची तुलना तैवानशी होऊ शकत नाही. तरीही यात साम्य शोधण्याचा प्रयत्न झालाच तर या क्षेत्रात नवे संकट उभे राहील, अशी धमकी वेंबिन यांनी दिली आहे.