अमेरिका रशियाला जीपीएस नाकारू शकते

- रशियन अंतराळ संस्थेच्या प्रमुखांचा दावा

जीपीएसमॉस्को/वॉशिंग्टन – युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियावर अमेरिका आणि युरोपिय देशांनी कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या देशांनी रशियाबरोबर सर्वच क्षेत्रातील सहकार्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांचा पुढचा टप्पा म्हणून अमेरिका रशियाला ‘जीपीएस सॅटेलाईट नेव्हिगेशन’च्या वापरापासून दूर ठेवू शकते. याद्वारे रशियन लष्कराची युक्रेनमधील लष्करी कारवाई प्रभावित करण्याचा प्रयत्न अमेरिका करू शकते, असा दावा रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी केला. असे झालेच तरी रशियन जनतेने घाबरण्याचे कारण नाही. कारण अशा परिस्थितीसाठी रशिया स्वत:ची ग्लोनास सॅटेलाईट नेव्हिगेशन यंत्रणा वापरील, असे रोगोझिन यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी कझाकस्तानच्या बैकानूर प्रक्षेपण केंद्रावरुन रशियाच्या ‘सोयूझ एमएस-२१’ यानाने अंतराळासाठी उड्डाण केले. तीन रशियन अंतराळवीरांना घेऊन उडालेले सदर अंतराळयान तीन तासांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर दाखल झाले. रशिया-युक्रेन संघर्ष भडकल्यानंतर पहिल्यांदाच कुठल्यातरी देशाच्या अंतराळ यानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला भेट दिली. याआधीच आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात चार अमेरिकन, दोन रशियन आणि जर्मन अंतराळवीरांचा समावेश आहे.

रशिया-युक्रेन संघर्षामुळे अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांनी स्वीकारलेल्या भूमिकेचे पडसाद अंतराळ क्षेत्रातील सहकार्यावर देखील उमटतील, अशी शक्यता वर्तविण्यात येते. कारण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाची अंतराळ क्षेत्रातील क्षमता संपविण्याचेही प्रयत्न केले जातील, असे बजावले होते. त्यापाठोपाठ अमेरिका व युरोपिय देशांनी रशियाबरोबरच्या आगामी अंतराळ सहकार्यातून माघार घेतली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकलेल्या अमेरिकन व जर्मन अंतराळवीरांच्या माघारीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जीपीएसगेल्या तीन आठवड्यांच्या संघर्षाचा परिणाम अंतराळ सहकार्यावर होणार नाही, असे दावे अमेरिकेची नासा करीत आहे. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिलेला इशारा अतिशय गंभीर असल्याचा दावा अमेरिकेतील विश्‍लेषकांनी केला होता. युरोपिय देशांनी देखील पर्यायावर विचार सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तर अंतराळप्रवास केलेले पहिले अंतराळवीर युरी गॅगरीन यांचे नाव ‘स्पेस फाऊंडेशन सेंसर्स’नी कमी केले आहे. गॅगरीन हे सोव्हिएत रशियन अंतराळवीर होते.

अशा परिस्थितीत, रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी संभाव्य धोक्याबाबत रशियन जनतेला सावध केले. येत्या काळात अमेरिकेने रशियाची ‘जीपीएस’ सेवा खंडीत केली तर अजिबात घाबरण्याचे कारण नाही, असे आश्‍वासन रोगोझिन यांनी दिले. निर्बंधांच्या चौकटीत ही कारवाई योग्य असल्याचे अमेरिका जगाला पटवून देऊ शकते. पण रशियन जनतेने ‘ग्लोनास’ या रशियन सॅटेलाईट नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे रोगोझिन यांनी सुचविले.

leave a reply