अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्स सागरी सुरक्षा सहकार्य भक्कम करणार

-अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची घोषणा

टोकिओ – नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्राच्या सुरक्षेला चीनचा धोका वाढत चालला आहे. या धोक्याविरोधात आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी वाहतुकीसाठी अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्स सुरक्षा सहकार्य उभारणार आहे, अशी घोषणा अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांनी केली. यासंबंधी तीनही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडणार आहे. काही तासांपूर्वीच फिलिपाईन्सने अमेरिकेला चीनविरोधी कारवाईसाठी लष्करी तळ वापरण्याचा प्रस्ताव दिला होता.

jap us philippinesइंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमक लष्करी हालचाली या गेल्या काही महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरत आहेत. काही आठवड्यांपूर्वी ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या विनाशिकांनी जपानच्या सेंकाकू आणि ओकिनावा बेटांच्या हद्दीजवळून प्रवास केला होता. तर गेल्याच महिन्यात चीनच्या विनाशिकांनी जपानच्या उत्तरेकडील सागरी क्षेत्रात युद्धसरावाचे आयोजन केले होते. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या विनाशिकांनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करून उत्खननही सुरू केले होते.

ईस्ट व साऊथ चायना सीबरोबरच चीनने तैवानच्या आखातातही घुसखोरी वाढविल्याचा आरोप अमेरिका व जपान करीत आहे. गेल्या महिन्यात चीनच्या विनाशिकांनी तैवानच्या आखातात लाईव्ह फायरिंगचा सराव केला. तसेच तैवानची बेटे ताब्यात घेण्याचा अभ्यास करून चीनने जाहीररित्या तैवानला धमकावले होते. चीनच्या या लष्करी हालचाली क्षेत्रीय देशांबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा ठपका अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी ठेवला होता.

अशा परिस्थितीत, मंगळवारी जपानची राजधानी टोकिओ येथे अमेरिकेच्या दूतावासाचे उपप्रमुख रेमंड ग्रीन यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिका, जपान व फिलिपाईन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये जपानच्या उपसंरक्षणमंत्री किमी ओनोदा आणि फिलिपाईन्सच्या दूतावासाचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी रॉबस्पिर बोलिवर यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत अमेरिकन अधिकारी ग्रीन यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपल्या लष्करी कारवायांनी तणाव माजविणाऱ्या चीनवर टीका केली.

‘एकतर्फी कारवाई आणि धमक्यांचा वापर करून कुठलाही देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर वर्चस्व गाजवू शकत नाही. चीनच्या चिथावणखोर कारवायांवर टीका करण्यापासून कुणीही कचरता कामा नये’, असे आवाहन रेमंड ग्रीन यांनी केले. ईस्ट आणि साऊथ चायना सीमधील परदेशी जहाजांवर चीन करीत असलेली कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप ग्रीन यांनी केला. चीनच्या या अरेरावीविरोधात अमेरिका, जपान आणि फिलिपाईन्स सुरक्षा सहकार्य उभारणार असल्याचे ग्रीन यांनी स्पष्ट केले. या लष्करी सहकार्याबाबत तीनही देशांच्या 20 लष्करी अधिकाऱ्यांचा गट एकत्र येऊन दोन दिवसांची चर्चा करणार आहे.

leave a reply