चीन, रशियाबरोबरच्या सहकार्यावरुन अमेरिकेचा आखाती मित्रदेशांना इशारा

आखाती मित्रदेशांना इशारावॉशिंग्टन – आखातातील मित्रदेशांनी चीन आणि रशियासह संरक्षणविषयक सहकार्य प्रस्थापित केले तर अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडतील. आखाती मित्रदेशांवर अमेरिकेचे सहकार्य गमावण्याची वेळही ओढावू शकते, असा इशारा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे उपमंत्री कॉलिन काह्‌‍ल यांनी दिला. तसेच काह्‌‍ल यांनी इराणशी मैत्री असणाऱ्या देशांबरोबर कसे काय सहकार्य प्रस्थापित होऊ शकते, असा सवाल आखाती देशांना केला. थेट उल्लेख केला नसला तरी इस्रायल, सौदी अरेबिया, युएई या देशांना उद्देशून पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

बायडेन प्रशासनाची धोरणे अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये अविश्वास निर्माण करणारी ठरत आहेत. अमेरिका आखातातील आपले मित्र व सहकारी देश गमावत असल्याची टीका जोर पकडत आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाबरोबरच बायडेन यांच्याच डेमोक्रॅट्स पक्षातूनही विरोधाचे सूर लावले जात आहेत. बायडेन यांनी अणुकार्यक्रमाबाबत इराणबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर इस्रायल, सौदी अरेबिया, युएई व इतर आखाती देशांमधील नाराजी वाढू लागली आहे. याचे परिणाम काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर कडाडले होते. यानंतर बायडेन यांनी सौदी व युएईच्या नेत्यांना इंधनाचे उत्पादन वाढविण्याची मागणी करण्यासाठी फोन केले होते. पण दोन्ही देशांच्या नेत्यांनी बायडेन यांचा फोन नाकारल्याची बातमी समोर आली होती. त्याचबरोबर सौदी, युएईने रशियाबरोबरील जवळीक वाढविण्यास सुरुवात केली आहे. आखातातील अमेरिकेच्या मित्रदेशांच्या या भूमिकेला बायडेन प्रशासनाची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत. पण बायडेन प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून आखाती देशच यासाठी कारणीभूत असल्याचा पलटवार केला आहे.

काही दिवसांपूर्वी बाहरिन येथे आयोजित केलेल्या ‘मनामा डायलॉग’मध्ये बोलताना पेंटॅगॉनचे उपमंत्री कॉलिन काह्‌‍ल यांनी हा आरोप केला. आखाती देशांच्या चीन व रशियाबरोबर वाढत असलेल्या संरक्षण सहकार्यामुळे अमेरिकेचे सुरक्षाविषयक हितसंबंध धोक्यात येत आहेत. येत्या काळात आखाती देशांवर अमेरिकेचे सहकार्य गमावण्याची वेळ ओढावू शकते, असे काह्‌‍ल यांनी बजावले. त्याचबरोबर चीन व रशिया आखाती देशांना सुरक्षा पुरवू शकत नाही, असे पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धमकावले आहे.

चीन व रशिया, हे दोन्ही देश इराणबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे आहेत. रशियाने युक्रेनच्या युद्धात इराणकडून ड्रोन्सची खरेदी केली आहे. असे असताना चीन व रशिया इराणविरोधात आखाती देशांच्या सुरक्षेसाठी धावून येतील का? असा सवाल काह्‌‍ल यांनी केला. पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आखाती देशाचा नामोल्लेख करण्याचे टाळले. पण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चीनचे सहाय्य घेणाऱ्या इस्रायलपासून ते सौदी, युएई या आखाती मित्रदेशांपर्यंत पेंटॅगॉनच्या इशाऱ्याची व्याप्ती असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply