वॉशिंग्टन – सिरियाच्या उत्तरेकडील भागात लष्करी मोहीम छेडून 30 किलोमीटर लांबीचा ‘सिक्युरिटी झोन` तयार करण्याची घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी केली. तुर्कीच्या या लष्करी कारवाईवर अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. सिरियामध्ये तैनात अमेरिकन जवानांची सुरक्षा आणि क्षेत्रीय स्थैर्य धोक्यात येईल, अशी कुठलीही कारवाई तुर्कीने करू नये, अशी ताकीद अमेरिकेने दिली.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियाबाबत आक्रमक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीमधील सुमारे दहा लाख सिरियन निर्वासितांना मायदेशी रवाना करण्याची घोषणा केली होती. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर संयुक्त राष्ट्रसंघ तसेच पाश्चिमात्य देशांनी चिंता व्यक्त केली होती. याला दहा दिवसही पूर्ण होत नाही तोच सोमवारी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी सिरियात लष्करी मोहीम छेडण्याचे जाहीर केले.
लवकरच सिरियाच्या उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांविरोधात मोहीम छेडून 30 किलोमीटरचा सिक्युरिटी झोन तयार करण्यात येईल, असे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी स्पष्ट केले. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आक्षेप नोंदविला. ‘सिरियाच्या उत्तरेकडील भागात लष्करी कारवाई छेडण्याच्या तुर्कीच्या घोषणेने अमेरिका चिंतित झाला आहे. यामुळे सदर भागातील नागरी व्यवस्था बाधित होईल`, असे अमेरिकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस म्हणाले.
तसेच 2019 सालच्या कराराचे पालन करून तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करू नये. यामुळे क्षेत्रीय स्थैर्य आणि अमेरिकन जवानांची सुरक्षा बाधित होऊ शकते, असा इशारा प्राईस यांनी दिला.
2016 सालापासून आत्तापर्यंत तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात तीन वेळा मोठ्या लष्करी मोहिमा राबविल्या होत्या. तुर्कीतील ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी-पीकेके` तसेच सिरियातील ‘पिपल्स प्रोटेक्शन युनिट्स-वायपीजी` या दोन्ही कुर्द संघटनांना तुर्कीने दहशतवादी घोषित केले आहे. तुर्कीच्या सुरक्षेसाठी कुर्दांचे हे दोन्ही गट धोका ठरत असल्याचे सांगून त्यावेळी तुर्कीने सदर लष्करी कारवाया केल्या होत्या.
पण सिरियातील वायपीजी या कुर्द बंडखोरांच्या संघटनेने अमेरिकेला ‘आयएस` या दहशतवादी संघटनेविरोधात सहाय्य पुरविले होते. यावरुन तुर्की आणि अमेरिकेमध्ये तीव्र मतभेद झाले होते. अमेरिका दहशतवादविरोधी कारवाई दहशतवाद्यांचेच सहाय्य घेत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी अमेरिकेच्याओबामा प्रशासनावर केला होता.
दरम्यान, आत्ता देखील तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात लष्करी कारवाईची घोषणा केल्यामुळे अमेरिका अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.