तेल अविव – बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सरकार स्थापन करण्याआधीच अमेरिकेने वेस्ट बँकच्या मुद्यावरुन इस्रायलच्या भावी पंतप्रधानांना धमकावले. नेत्यान्याहू यांच्या सरकारने संपूर्ण वेस्ट बँक किंवा येथील छोटासाही भूभाग इस्रायलला जोडण्याचा प्रयत्न केलाच, तर अमेरिका त्यांच्याविरोधात लढा देईल, असे इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत टॉम नाईड्स यांनी बजावले आहे. त्याचबरोबर पुढील सहा महिन्यात बरेच काही घडेल, असे सूचक उद्गारही अमेरिकेच्या राजदूतांनी काढले आहेत.
काही तासांपूर्वीच इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांनी बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. इस्रायलचे भावी पंतप्रधान असलेल्या नेत्यान्याहू यांनी देखील, मी प्रत्येक इस्रायली नागरिकाचा पंतप्रधान म्हणून काम पाहणार असल्याची ग्वाही दिली. विरोधकांच्या मतांचाही आदर करणार असल्याचे नेत्यान्याहू यांनी जाहीर केले. असे असले तरी इस्रायलमधील प्रखर राष्ट्रवादी नेत्यांसोबत नेत्यान्याहू तयार करीत असलेल्या नव्या सरकारमध्ये कुणाला संधी मिळते, याकडे इस्रायलसह प्रमुख देशांचे लक्ष लागले आहे. नेत्यान्याहू यांच्या सरकारमध्ये कट्टर उजव्या गटाच्या नेत्यांना स्थान मिळणार असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. असे झाल्यास नेत्यान्याहू सरकार वेस्ट बँकबाबत कठोर धोरणे स्वीकारतील, वेस्ट बँकचा भूभाग इस्रायलशी जोडून घेतला जाईल.
इराणविरोधातही आक्रमक भूमिका स्वीकारली जाईल, असे दावे अमेरिकी विश्लेषक करू लागले आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या बायडेन प्रशासनाने यावर चिंता व्यक्त केली होती. इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत टॉम नाईड्स यांनी इस्रायली प्रसारवाहिनीशी बोलताना नेत्यान्याहू यांच्या आगामी सरकारला इशारा दिला.
‘नेत्यान्याहू यांच्या आगामी सरकारबरोबर काम करण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे. पण वेस्ट बँकबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट आहे. वेस्ट बँक पुन्हा इस्रायलमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेचा विरोध असेल व याविरोधात अमेरिका लढा देईल. अरब देश देखील याच्या विरोधात आहेत’, असे नाईड्स यांनी बजावले. तर नेत्यान्याहू यांच्या सरकारमध्ये बेन ग्वीर यांना स्थान मिळाल्यास, त्याबाबतही अमेरिकेची स्वतंत्र भूमिका असेल, असे सांगून नाईड्स यांनी ग्वीर यांच्या निवडीला अमेरिकेचा विरोध असल्याचे संकेत दिले.