तैवानवर हल्ला चढविल्यास अमेरिका चीनच्या ‘लॉजिस्टिक’ क्षमतांना लक्ष्य करेल

- अमेरिकी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इशारा

‘लॉजिस्टिक’वॉशिंग्टन – चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिकी संरक्षणदले चीनच्या मुख्य ‘लॉजिस्टिक’ क्षमतांवर हल्ले करतील, असा इशारा अमेरिकी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. ‘अटलांटिक कौन्सिल’ या अभ्यासगटाच्या कार्यक्रमात बोलताना जनरल क्लिंटन हायनोट यांनी, अमेरिकेच्या मित्रदेशांवर हल्ला करणे इतर देशांना सोपे जाणार नाही, असे खरमरीत शब्दात बजावले. चीनने तैवानवर हल्ला केल्यास ती त्यांच्यासाठी इतिहासातील सर्वात अवघड व कठीण लष्करी मोहीम ठरेल, यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशा शब्दात जनरल हायनोट यांनी चीनला याच्या परिणामांची जाणीव करून दिली.

गेल्या महिन्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. या दौऱ्याने भडकलेल्या चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रात चिचथावणीखोर युद्धसरावांना सुरुवात केली. तैवानला वेढा घालणाऱ्या हवाई व सागरी युद्धसरावाचे आयोजन करून चीन तैवानवर हल्ल्याची तयारी करीत आहे, असा दावा तैवानचे नेते तसेच आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने याची गंभीर दखल घेतली असून तैवानला सहकार्य करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यात अमेरिका, जपान व ऑस्ेलियासह युरोपिय देशांचाही समावेश असल्याचे दिसत आहे.

‘लॉजिस्टिक’पेलोसी यांच्या भेटीनंतर चीनची शेकडो विमाने व युद्धनौका तैवानच्या हद्दीजवळ घिरट्या घालत असून घुसखोरीचेही प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवानच्या जवळ असलेल्या चिनी प्रांतांमध्ये जोरदार लष्करी जमवाजमव सुरू केली आहे. अनेक भागांमध्ये ‘लाईव्ह फायर’ युद्धसरावांचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व हालचाली तैवानवरील आक्रमणाची तयारी असून कुठल्याही क्षणी भडका उडू शकतो, अशा स्वरुपाची वक्तव्ये दोन्ही बाजूंकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

अटलांटिक कौन्सिल या अभ्यासगटाने ‘फ्युचर ऑफ एअर वॉरफेअर’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यात बोलताना, ‘एअरफोर्स फ्युचर्स’चे उपप्रमुख असणाऱ्या जनरल हायनोट यांनी चीनला सज्जड इशारा दिला. ‘अमेरिकेच्या मित्रदेशांवर कोणीही आक्रमणाचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी ती मोहीम सहज सोपी असणार नाही. ९० मैलांची सामुद्रधुनी ओलांडून तैवानविरोधात हल्ले करणे किती कठीण ठरु शकते यावर अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या चीनने विचार केला असावा, अशी मला आशा आहे’, असे जनरल हायनोट यांनी बजावले.

तैवान क्षेत्रातील जैसे थे स्थिती कायम रहावी, असे अमेरिकेला वाटते. तैवानचे सागरी क्षेत्र पार करून चीनने तैवानवर हल्ला चढविलेला किंवा जपानवर क्षेपणास्त्र डागलेले पाहण्याची अमेरिकेची इच्छा नाही, हेदेखील अमेरिकी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. अमेरिकेतील सत्ताधारी राजवट तसेच संरक्षण विभागाकडून, अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याची आश्वासने वारंवार देण्यात आली आहेत. मात्र त्याबद्दल अधिक उघडपणे बोलण्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी टाळले होते. या पार्श्वभूमीवर जनरल हायनोट यांनी चीनच्या ‘लॉजिस्टिक’ला लक्ष्य करण्याचा इशारा देऊन साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

leave a reply