लष्कराच्या विशेष मोहिमेत अल-शबाबचे 100 दहशतवादी ठार

सोमालियाच्या संरक्षण मंत्रालयाची घोषणा

मोगादिशू – आठवड्याभरापूर्वी सोमालियासह आफ्रिकेला हादरवून सोडणाऱ्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेवर मोठी कारवाई केल्याचा दावा सोमालियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. लष्कराने केलेल्या विशेष मोहिमेत अल कायदा संलग्न अल-शबाबचे 100 हून अधिक दहशतवादी ठार केल्याचे सोमालियाने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाने या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचे फोटोग्राफ्स देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.

somalia forcesगेल्या शनिवारी राजधानी मोगादिशुमधील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतीबाहेर झालेल्या भीषण कारबॉम्बस्फोटांच्या मालिकेत 120 जणांचा बळी गेला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये महिला व विद्यार्थी, उद्योजक तसेच पोलीसांचाही समावेश होता. राष्ट्राध्यक्ष हसन शेख यांनी मे महिन्यात सोमालियाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राजधानी मोगादिशुत झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. गेली कित्येक वर्षे अल कायदाशी संलग्न असलेल्या आणि सोमालियाची सुरक्षा वेठीस धरणाऱ्या अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

आफ्रिकी महासंघासह अमेरिका, तुर्की, सौदी अरेबिया, जर्मनी व कतार या देशांनी मोगादिशुतील स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला होता. गेल्या 15 वर्षांपासून अल-शबाब सोमालियाचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सोमालियात 10 हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

अल शबाबला संपविण्यासाठी अमेरिका, आफ्रिकी महासंघ व केनिया यासारख्या देशांनी सोमालियाला मोठ्या प्रमाणात सहाय्य केले होते. मात्र गेल्या दशकभरापासून लष्करी मोहीम सुरू असूनही अल-शबाबच्या कारवाया थांबलेल्या नाहीत, हे राजधानी मोगादिशूतील हल्ल्यांवरुन स्पष्ट झाले होते.

अल-शबाबच्या या हल्ल्यांविरोधात सोमालियामध्ये असंतोष उफाळत असून राष्ट्राध्यक्ष हसन शेख यांच्यावरील दडपण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर, सोमालियाच्या लष्कराने शुक्रवारी अदानयबल येथे मोठी कारवाई केली. अल-शबाब व या संघटनेशी जोडलेल्या स्थानिक गटाच्या दहशतवाद्यांनी सोमालियाच्या लष्कराचे हल्ले थोपविण्याचा प्रयत्न केला. पण सोमालियाच्या हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यांमुळे अल-शबाबचे दहशतवादी कोंडीत सापडले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांना संपविल्याचा दावा सोमालियाचे लष्कर करीत आहे.

leave a reply