जेरूसलेम – इस्रायलने सोमवारी मध्यरात्रीनंतर गाझापट्टीतील दहशतवाद्यांच्या तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्यात १३ जण ठार झाले. यामध्ये इस्लामिक जिहादचे तीन वरिष्ठ कमांडर्स मारले गेल्याची माहिती इस्रायली संरक्षणदलाने दिली. तर या हल्ल्यात लहान मुलांचा बळी गेल्याचा आरोप पॅलेस्टिनी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी इस्लामिक जिहादने केलेल्या १०४ रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केली. पण यामुळे संतापलेल्या इस्लामिक जिहाद तसेच हमासने इस्रायल व त्यांच्या नेत्यांना या हल्ल्याची गंभीर किंमत चुकवावी लागेल, असे धमकावले आहे. त्यामुळे इस्रायल व गाझात नवा संघर्ष पेटणार असल्याचे दिसते.
गेल्या आठवड्यात इस्रायलच्या कोठडीत इस्लामिक जिहादचा वरिष्ठ कमांडर उपोषणामुळे दगावला. इस्रायलच्या सुरक्षादलांनी आपल्या कमांडरची मागणी मान्य न केल्यामुळे हे घडल्याचा ठपका ठेवून गाझापट्टीतील इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर जोरदार रॉकेट हल्ले प्रक्षेपित केले होते. आयर्न डोम हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलच्या दिशेने येणारे रॉकेट्स भेदून हे हल्ले उधळले. तसेच इस्लामिक जिहादच्या महत्त्वाची ठिकाणे नष्ट केली होती. पण या कारवाईतून इस्रायलवर हल्ले चढविणारे दहशतवादी कमांडर्स बचावले होते.
इस्रायलच्या हवाईदलाने सोमवारी मध्यरात्रीनंतर गाझातून झालेल्या त्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले. इस्लामिक जिहादचे कमांडर्स लपलेल्या इमारतीवर इस्रायलने हल्ले चढविले. यामध्ये खलिल बाहतीनी, तारेक इझेल्दीन आणि जेहाद घनमन हे कमांडर्स ठार झाले. यापैकी तारेक इझेल्दीन हा गाझा व वेस्ट बँकमधील इस्लामिक जिहादच्या नेत्यांमधील महत्त्वाचा दूवा होता. तर जेहाद घनमन हा या संघटनेच्या काऊन्सिलवर होता. त्यामुळे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी इस्लामिक जिहादला जबर हादरा दिल्याचा दावा केला जातो.
गाझापट्टीतून या हल्ल्यांवर संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी गाझातील नागरिकांनी या हल्ल्यावर जोरदार टीका केली. तसेच इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा दिल्या. तर इस्लामिक जिहादबरोबरच हमास या दहशतवादी संघटनेनेही इस्रायलला उद्देशून एकत्रित धमकी प्रसिद्ध केली. इस्लामिक जिहादच्या सदस्यांवर हल्ले चढविणारा इस्रायल व त्यांच्या नेत्यांना याची जबर किंमत चुकती करावी लागेल, असे या धमकीत म्हटले आहे. इस्रायलचे नेते यापुढील कारवाईतून अजिबात बचावणार नाहीत, असे या दोन्ही संघटनांनी जाहीर केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनसाठी नियुक्त केलेल्या विशेषदूतांनी देखील इस्रायलच्या या कारवाईवर टीका केली. गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांना लक्ष्य करणारी ही कारवाईचे अजिबात समर्थन करता येणार नाही, असे राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी म्हटले आहे. तर इस्रायलच्या संरक्षणदलाने केलेल्या या कारवाईचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबरच विरोधी गटनेते व माजी पंतप्रधान येर लॅपिड तसेच माजी संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी स्वागत केले. इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या दहशतवाद्यांवर याहून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इस्रायली नेते करीत आहेत.
दरम्यान, सोमवारच्या या कारवाईनंतर इस्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटनांमध्ये मोठा संघर्ष भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
हिंदी