अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाव्हायरसचे १३०० बळी – अमेरिकी नौदलातही साथीचा फैलाव

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने अमेरिकेत १३३६ जणांचा बळी घेतला. यामुळे या साथीने अमेरिकेतील एकूण बळींची संख्या ८४५४ वर पोहोचली आहे. मात्र, येत्या आठवड्यात देशातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल, अशी चिंता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील काही प्रांतांच्या हलगर्जीपणामुळे हे संकट ओढावत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.
अमेरिकेत कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असून गेल्या चोवीस तासात या देशात ३४ हजाराहून नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या अमेरिकेत ३,११,६३५ जणांना या साथीची लागण झाली असून यापैकी १५ हजार जणांची प्रकृती सुधारली तर आठ हजार जण अत्यव्यस्थ असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेत सलग दोन दिवस एक हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे.
न्यूयॉर्क प्रांत अमेरिकेतील या साथीचे सर्वात मोठे केंद्र ठरत आहे. आतापर्यंत न्यूयॉर्कमध्ये ३५६५ जण दगावले झाले आहेत. मात्र, ‘येत्या काळात अधिक मोठ्या संख्येने बळी जाईल’, अशी गंभीर चिंता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या साथीने अमेरिकेत एक ते दोन लाखांपर्यंत बळी जातील, अशी भयावह शक्यता वर्तविली होती.
अमेरिकेतील या साथीच्या फैलावासाठी चीनमधून अमेरिकेत दाखल झालेले नागरिक जबाबदार असल्याचा दावा केला जातो. चीनमध्ये या साथीने धुमाकूळ घातला होता त्याकाळात चीनमधून अमेरिकेत किमान ४,३०,००० जण दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी विमान प्रवासावर बंदी जाहीर करण्याआधी हा प्रकार घडल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे.
दरम्यान, आशिया पॅसिफिक क्षेत्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या ‘युएसएस थिओडोर रुझवेल्ट’ या अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेवरील १५५ नौसैनिकांना या साथीची लागण झाल्याचे आढळले आहे. यानंतर आशिया पॅसिफिक क्षेत्रात तैनात अमेरिकी युद्धनौका आणि लष्करी तळांवरील सैनिकांची वैद्यकीय चाचणी सुरू झाली आहे.

leave a reply