तीन दिवसांपूर्वी भारताने केलेल्या हल्ल्यात १५ पाकिस्तानी जवान व आठ दहशतवादी ठार झाले

- गुप्तचर यंत्रणेचा दावा

श्रीनगर – तीन दिवसांपूर्वी भारतीय जवानांनी बोफोर्स तोफांचा भडीमार करून नियंत्रण रेषेजवळ ‘पीओके’मध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ, त्यांची शस्त्रकोठारे आणि पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उडवून दिल्या होत्या. येथे झालेल्या प्रचंड हानीबाबत पाकिस्तान अवाक्षरही काढत नसला, तरी यामध्ये पाकिस्तानचे १५ सैनिक आणि ८ दहशतवादी ठार झाल्याचे उघड होत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार पाकिस्तानला फार मोठी हानी सहन करावी लागली आहे. त्यानंतर बिथरलेला पाकिस्तान भारतातील नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत असून रविवारी या गोळीबारात अडीच वर्षाच्या एका मुलीसह आणखी दोघा नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय जवान पाकिस्तानच्या या कुरापतींना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

सध्या काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ मोठा संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. नियंत्रण रेषेपलीकडे सुमारे २०० ते २५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याचा गुप्तचर संस्थेने अहवाल दिला होता. या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीत साहाय्य करण्यासाठीच पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार करीत आहे. ५ एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला होता. मात्र यावेळी दहशतवाद्यांबरोबरील चकमकीत पाच भारतीय जवानांना वीरमरण आले होते. यानंतर भारतीय लष्कराने १० एप्रिल रोजी केरन सेक्टरच्या पलीकडील पीओकेमधील किशनगंगा नदी खोऱ्यातील शारदा, दूधनील, शाहकोट भागात मोठी कारवाई केली होती.

१५५ एमएमच्या बोफोर्स तोफा, तसेच १०५ एमएमच्या इतर तोफांचा भडीमार करून केलेल्या या कारवाईचा ड्रोनद्वारे घेतलेला व्हिडिओही भारतीय लष्कराने प्रसिद्ध केला होता. त्यामुळे पाकिस्तानला असे काही घडले नसल्याचे सांगून आपला बचाव करण्याची संधी मिळाली नाही. पाकिस्तानी लष्कराने भारताने हल्ला केल्याचे मान्य केले असले तरी, भारताच्या कारवाईत नागरी वस्त्या लक्ष्य करण्यात आल्याचा कांगावा करीत झालेले नुकसान लपविण्याचा प्रयत्न केला.

पण भारतीय लष्करच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ, त्यांची शस्त्रे आणि पाकिस्तानच्या चौक्याच उद्ध्वस्त झाल्याच आहेत, त्याचबरोबर मोठी जीवितहानीही पाकिस्तानला सोसावी लागली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांच्या अहवानुसार १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार झाले आहेत.

दरम्यान या कारवाईनंतर बिथरलेला पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत आहे. यामध्ये पाकिस्तानच्या गोळीबार व मोर्टर्स हल्ल्यात रविवारी तिघांचा बळी गेला. यामध्ये अडीच वर्षाच्या एका लहान मुलीचा समावेश आहे. पाकिस्तानच्या या कुरापतीला भारतानेही जोरादार प्रत्युत्तर दिले आहे. बोराह, दूधनील, राखचिकरी, चिरीकोटा भागाला भारतीय लष्कराने लक्ष्य केल्याची बाब पाकिस्तानने मान्य केली आहे. मात्र पाकिस्तानी लष्कराने यावेळीही भारताने नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचा ओरडा केला आहे. तसेच यामध्ये तीन नागरिक ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीर पीपल्स मोव्हमेन्टचे अध्यक्ष मजीद मलिक यांनी भारताने नियंत्रण रेषेवर अघोषित युद्धच सुरु केल्याचा कांगावा केला आहे.

leave a reply