पुण्यात केमिकल कंपनीतील आगीत होरपळून 17 जणांचा मृत्यू

पुणे – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या पिरंगुट येथील एमआयडीसीमध्ये लागलेल्या आगीत 17 जणांचा बळी गेला आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर येत आहे. कारखान्यातील रसायनांमुळे ही आग वेगाने पसरली आणि काही कळायच्या आतमध्ये कारखान्यात आग व धुराचे साम्राज्य पसरले.

पुण्यात केमिकल कंपनीतील आगीत होरपळून 17 जणांचा मृत्यूसोमवारी सायंकाळी पिरंगुट औद्यागिक वसाहतीतीत घोटवडे फाट्यानजीक उरवडे गावाजवळ असलेल्या ‘एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी’ या रासायनिक कंपनीत आगीचा मोठा भडका उडाला. ही आग नक्की कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र कारखान्यात असलेल्या रसायनाच्या साठ्यांमुळे ही आग वेगाने पसरली. यामुळे सर्व कामगारांना कारखान्यातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आग लागली तेव्हा कंपनीत 37 कामगार काम करीत होते. यातील 20 कामगारांना कारखान्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले.

ही आग इतकी भीषण होती की आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोट काही किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. आग लागल्यावर काही मिनिटातच अग्नीशामकदलाचे 4 ते 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत आग लगेच नियंत्रणात आणण्याच्या पलिकडे गेली होती. कारखान्यात अडकलेल्या कामगारांना सोडविण्यासाठी कंपनीची भींतही जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. मात्र एकामागोमाग एक कामगारांचे मृतदेह सापडत गेले. आगीत होरपळलेल्या कामगारांमध्ये काही महिला कामगारांचा समावेश आहे.

दरम्यान, पुण्यातील पाषाण रोडवरील नॅशनल केमिकल लॅबरोटरीजच्या इमारतीमधील एका प्रयोगशाळेतही सोमवारी सकाळी आग लागली होती. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागताच येथील कर्मचार्‍यांनी सर्व ज्वलनशील पदार्थ हटविण्यास सुरूवात केली. तसेच अग्नीशामकदलाचे जवान दाखल होईपर्यंत इमारतीमध्ये असलेल्या अग्नीशामक व्यवस्थेच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे ही आग वेळीतच नियंत्रणात आणता आली.

leave a reply