अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत भीषण हत्याकांड माथेफिरुने केलेल्या गोळीबारात 21 जणांचा बळी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात 18 वर्षाच्या माथेफिरुने केलेल्या गोळीबारात 21 जणांचा बळी गेला. यामध्ये 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पण यामुळे अमेरिकेतील ‘गन लॉज्‌‍’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बंदुकींच्या वापरावर निर्बंध लादण्याची मागणी नव्याने केली आहे.

texas schoot shooterटेक्सास प्रांतातील सॅन अँटोनियो येथील 18 वर्षांचा माथेफिरु तरुण सॅल्वॅडोर रॅमोस याने स्वत:च्याच आजीला गोळी झाडून ठार केले. त्यानंतर घटनास्थळाहून फरार झालेल्या रॅमोसने उवाल्दे येथील ‘रॉब एलिमेन्ट्री’ शाळेच्या कुंपणावर कार आदळवून दहशत निर्माण केली आणि त्यानंतर बेछूट गोळीबार सुरू केला. या शाळेतील एका वर्गात घुसून त्याने इथल्या 19 विद्यार्थ्यांसह शिक्षकाचाही बळी घेतला. याची माहिती मिळाल्यानंतर टेक्सासच्या पोलिसांनी शाळेला घेरले. यानंतर रॅमोसने इथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रॅमोस ठार झाला. टेक्सासच्या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर रॅमोसकडे रायफल आणि बुलेटप्रूफ जॅकेट होते.

या भयंकर हत्याकांडानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा बंदुकीच्या विक्रीवरील बंदीची मागणी जोर पकडू लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हत्याकांडावर तीव्र दुःख व्यक्त करून बंदुकींच्या खरेदी-विक्रीवर बंदी टाकण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. अशी कारवाई करण्यात अमेरिकेतील ‘गन लॉबी’ अडचणी आणत असल्याची टीका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसेच हॉलिवूडमधील कलाकारांनी देखील टेक्सासमधील घटनेचा निषेध करून गन लॉज्‌‍ अर्थात बंदुकीवर निर्बंध लागू करण्याची मागणी केली. दहा दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या बफेलो या भागात एका सुपरमार्केटमध्ये माथेफिरुने केलेल्या गोळीबारात 13 जणांचा बळी गेला होता. मात्र टेक्सास शाळेतील हल्ला हा गेल्या दहा वर्षांमधील सर्वात भयानक घटना मानली जात आहे. 2012 साली कनेक्टिकट येथील शाळेत माथेफिरूने केलेल्या गोळीबारात 20 विद्यार्थ्यांसह 26 जणांचा बळी गेला होता.

leave a reply