येमेनमधील अल कायदाच्या हल्ल्यात २१ बंडखोर ठार

- अल कायदाकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अपहृत कर्मचाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध

२१ बंडखोर ठारएडन – अल कायदाच्या दहशतवाद्यांनी येमेनच्या अबयान प्रांतात केलेल्या हल्ल्यात ‘सदर्नट्रान्झिश्नल काऊन्सिल-एसटीसी’ या स्थानिक बंडखोर संघटनेचे २१ बंडखोर ठार झाले. तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत अल कायदाचे सहा दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याशिवाय अल कायदाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अपहृत कर्मचाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून आंतरराष्ट्रीय संघटनांना इशारा दिला. यामुळे अल कायदा येमेनमध्ये पुन्हा डोके वर काढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

येमेनमधील ‘अल कायदा इन अरेबियन पेनिन्सूला-एक्यूएपी’ या दहशतवादी संघटनेने मंगळवारी दक्षिणेकडील अबयान प्रांतात वर्चस्व असलेल्या स्थानिक बंडखोर संघटनेच्या चौकीवर हल्ला चढविला. सुमारे तीन तास सुरू असलेल्या या संघर्षात ‘एसटीसी’ या संघटनेचे २१ बंडखोर ठार झाले. तर आपल्या संघटनेने दिलेल्या प्रत्युत्तरात अल कायदाचे सहा दहशतवादी ठार झाल्याची माहिती एसटीसीने दिली. एसटीसी ही येमेनमधील सरकार संलग्न बंडखोर संघटना आहे. येमेनमधील हौथी बंडखोरविरोधी संघर्षात एसटीसीने येमेनी लष्कराला साथ दिली होती.

२१ बंडखोर ठारया हल्ल्याआधी अल कायदाने संयुक्त राष्ट्रसंघाचा कर्मचारी ‘अकम सोफयोल अनाम’ याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये अनाम आपल्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आपल्या सुटकेसाठी आवाहन करीत आहे. राष्ट्रसंघाने अल कायदाची मागण्या मान्य कराव्या, अशी याचना अनाम करीत आहे. फेब्रुवारी महिन्यात अल कायदाने राष्ट्रसंघाच्या पाच कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. यामध्ये येमेनमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा कार्यालयाचे संचालक अनाम यांच्यासह चार कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

त्यानंतर गेले सहा महिने अल कायदाने या अपहृत कर्मचाऱ्यांबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती. पण अचानक अपहृत कर्मचाऱ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करून अल कायदा येमेनमधील आपली उपस्थिती दाखवून देत आहे. येमेनमधील अल कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने दहा वर्षे लष्करी मोहिम राबविली होती. येथील अल कायदाच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले चढविल होते. अल कायदाच्या स्थानिक नेत्यांना ठार करून या मोहिमेत यश मिळाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. पण गेल्या दोन दिवसातील येमेनमधील अल कायदाच्या कारवाया अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत.

leave a reply