तैवानच्या हद्दीत चीनच्या २५ विमानांची घुसखोरी

- अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांची तैवानजवळून गस्त

घुसखोरीबीजिंग/तैपेई – तैवानवरचा चीनचा हल्ला ही भयंकर चूक ठरेल, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला होता. अमेरिकेच्या या इशार्‍याची आपण अजिबात पर्वा करीत नसल्याचे चीनने दाखवून दिले आहे. चिनी हवाईदलाच्या २५ विमानांनी तैवानच्या हवाईद्दीत घुसखोरी केली. ही तैवानच्या हवाईहद्दीतील चीनच्या विमानांची सर्वात मोठी घुसखोरी ठरते. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला चढविण्याची पूर्वतयारी करीत असल्याच्या दाव्याला बळ मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून चीनने तैवानच्या आखातातील आपल्या लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. गेल्या आठवड्यात चीनच्या ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौकेने आपल्या ताफ्यासह तैवानच्या आखातात सराव केला होता. तसेच येत्या काळातही या क्षेत्रात नियमितपणे युद्धसरावाचे आयोजन केले जाईल, असे चीनने जाहीर केले होते.

घुसखोरीतैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असून कुठल्याही क्षणी याचा आपण ताबा घेऊ, अशा धमक्या चीनने दिल्या होत्या. चीनचे लष्करी अधिकारी व विश्‍लेषकांनी तशा घोषणाही केल्या होत्या. अशा परिस्थितीत, युद्धनौकांचा सराव व घोषणा करून चीन तैवानला सज्जड इशारा देत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी केला होता.

यावर तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिली होती. चीनने हल्ला चढविलाच, तर तैवान अखेरपर्यंत हे युद्ध लढेल, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी बजावले होते. चीनने तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानाची खिल्ली उडवून चीनच्या लष्करासमोर तैवानचा निभाव लागणार नसल्याचा दावा केला होता.

तैवानच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या या तणावाची दखल घेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी चीनला इशारा दिला होता. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका बांधिल असून घुसखोरीबळाचा वापर करून पश्‍चिम पॅसिफिकमधली स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तैवानवर हल्ला चढविणे ही चीनची भयंकर चूक ठरेल’, असा इशारा ब्लिंकन यांनी दिला होता. पण ब्लिंकन यांच्या या इशार्‍याची अजिबात पर्वा करीत नसल्याचे चीनने अवघ्या काही तासातच दाखवून दिले.

सोमवारी सकाळी चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्स’च्या एकूण २५ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसून गस्त घातली. यामध्ये चीनच्या १४ ‘शेनयांग जे-१६’ आणि चार ‘चेंगडू जे-१०’ या लढाऊ तर चार ‘एच-६के’ बॉम्बर विमानांचा समावेश होता, अशी माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. या घुसखोरीनंतर तैवानने आपली विमाने रवाना करून चिनी विमानांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर तैवानने आपली क्षेपणास्त्र यंत्रणाही कार्यान्वित केली.

यानंतर काही चिनी विमानांनी तैवानचे नियंत्रण असलेल्या प्रातास बेटांच्या हद्दीतही गस्त घातली. साऊथ चायना सीच्या क्षेत्रात येणार्‍या या बेटावरही चीन आपला अधिकार सांगत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनने तैवानच्या हद्दीतील घुसखोरी वाढविली आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी चीनच्या १५ तर शुक्रवारी ११ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये चीनने तैवानच्या विरोधात मोठ्या युद्धसरावांचे आयोजन करून तैवानच्या दिशेने क्षेपणास्त्रेही प्रक्षेपित केली होती. तर तैवानने देखील चीनच्या किनारपट्टीवरील शहरांना सहज लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. याशिवाय तैवानने चीनच्या नौदलाचा सामना करण्यासाठी आपल्या किनारपट्टीवरील सुरक्षा मजबूत केल्याची घोषणाही केली होती.

leave a reply