अफगाणिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३० जण ठार

- ‘आयएस’ जबाबदार असल्याचा संशय

३० जण ठारकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील प्रार्थनास्थळात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात ३० जण ठार, तर ४० जखमी झाले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानातील प्रभावी धार्मिक नेत्याचाही समावेश असल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्याभरात काबुलमधील प्रार्थनास्थळावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. या स्फोटांमध्ये तालिबानसंलग्न नेत्यांना लक्ष्य करण्यात आले असून यामागे ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

बुधवारी संध्याकाळी उत्तर काबुल सर-ए-कोताल खैरखाना भाग स्फोटाने हादरला. येथील प्रार्थनास्थळात गर्दी असताना हा स्फोट झाला. यात किमान ३० जणांचा बळी गेल्याचे अफगाणी माध्यमांनी म्हटले आहे. पण काबुलमधील रुग्णालयात २७ जणांचे मृतदेह दाखल झाले असून यामध्ये सात वर्षाच्या मुलासह आणखी पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तालिबानच्या कमांडरने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला या स्फोटात ३५ जणांचा बळी गेल्याची महिती दिली. यात एक धार्मिक नेता देखील ठार झाला आहे. पण त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

गेल्या सात दिवसात काबुलमधील प्रार्थनास्थळावर झालेला हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. याआधी १२ ऑगस्ट रोजी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात रहिमुल्ला हक्कानी हा धार्मिक नेता ठार झाला होता. तालिबानच्या राजवटीत सर्वात प्रभावी असलेल्या हक्कानी गटाचा प्रचारक अशी रहिमुल्लाची ओळख होती. तालिबानमधील अंतर्गत वादातून रहिमुल्ला हक्कानीला ठार केल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पाकिस्तानसंलग्न हक्कानी गटाचे तालिबानमधील वाढत्या वर्चस्वाने नाराज झालेल्या इतर गटांनी रहिमुल्लाला ठार केल्याचे दावे केले जात होते. पण पुढच्या काही तासात ‘आयएस’ने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

त्यामुळे तालिबानच्या काही कमांडर्सनी बुधवारच्या या हल्ल्यासाठी देखील आयएसवर संशय व्यक्त केला आहे. तर या स्फोटामुळे तालिबान आणि आयएसमधील संघर्ष पेटण्याची दाट शक्यता समोर येत आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येऊन एक वर्ष उलटले. पण अजूनही तालिबान अफगाणिस्तानची सुरक्षा निश्चित करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. अफगाणिस्तानातील ही परिस्थिती केवळ या देशासाठीच नाही तर नाटोच्या सदस्य देशांसाठी देखील चिंतेचा विषय ठरत असल्याचा दावा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी केला आहे.

leave a reply