युगांडातील एबोलाच्या साथीत 30 जणांचा बळी

ebola_uganda_safeकंपाला – पूर्व आफ्रिकेतील युगांडामध्ये एबोलाच्या साथीची व्याप्ती हळूहळू वाढताना दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी एबोलाची सुरुवात झालेल्या दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लादल्यानंतरही देशाच्या इतर भागांमध्ये एबोलाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी युगांडा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एबोलाच्या साथीत 30 जणांचा बळी गेला असून संसर्ग झालेल्यांची संख्या 100 वर जाऊन पोहोचली आहे. युगांडात एबोलाची साथ येण्याची गेल्या दोन दशकांमधील ही सहावी वेळ आहे.

uganda ebolaगेल्या महिन्यात 19 तारखेला मध्य युगांडातील मुबेंडे डिस्ट्रिक्टमध्ये एका 24 वर्षीय तरुणाचा एबोलामुळे मृत्यू झाला होता. तपासात एबोला विषाणूच्या ‘सुदान एबोलाव्हायरस’ या व्हेरिअंटमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ‘सुदान एबोलाव्हायरस’ हा एबोलाच्या सहा व्हेरिअंटपैकी एक असून दगावण्याचे प्रमाण 40 टक्क्यांहून अधिक आहे. 19 सप्टेंबर रोजी पहिला बळी गेल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात तीन जिल्ह्यांमध्ये एबोलाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवसातच रुग्णांची संख्या 60वर जाऊन पोहोचली व 25हून अधिक जण दगावल्याची माहिती देण्यात आली.

Ebola epidemic12 ऑक्टोबरला राजधानी कंपालातही एबोलाचा रुग्ण आढळला. त्यामुळे धास्तावलेल्या युगांडा सरकारने 15 ऑक्टोबर रोजी मध्य युगांडातील काही भागांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर बळींची संख्या घटली असली तरी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. बुधवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, एबोलाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 109 झाली असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सूत्रांनी दगावणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचा दावा केला आहे. आफ्रिकेतील आरोग्य यंत्रणेने साथ नियंत्रणात असल्याचा खुलासा केला असून अमेरिकेने आवश्यक औषधांचा साठा पाठविल्याची माहिती दिली आहे.

यापूर्वी 2018 ते 2020 या कालावधीत आफ्रिकेतील ‘डीआर काँगो’मध्ये एबोलाची मोठी साथ आली होती. यात सुमारे साडेतीन हजार जणांना एबोलाची लागण झाली होती. त्यातील दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. ‘डीआर काँगो’ला आतापर्यंत 13 वेळा एबोलाच्या साथीचा फटका बसला आहे. तर युगांडामध्ये गेल्या दोन दशकात पाचवेळा एबोलाची साथ आली असून सध्याची साथ ही सहावी असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply