अफगाणिस्तानात तालिबानच्या भीषण हल्ल्यांमध्ये ३० जणांचा बळी

Afganistan-Talibanकाबूल – सोमवारी अफगाणिस्तानातल्या सामंगान प्रांतातल्या हैबाक शहरात तालिबानने ‘नॅशनल डायरेक्टोरेट सिक्युरिटी’च्या (एनडीएस) कार्यालयावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात १४ जणांचा बळी गेला आहे. याआधी रविवारी तालिबानने कुंदुझ आणि बादकशाह प्रांतात चढविलेल्या सुरक्षा चौक्यांवर चढविलेल्या हल्ल्यात १६ जणांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्यांचा अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी निषेध केला आहे. तालिबानने हे हल्ले थांबविले नाही तर शांतीचर्चेवर याचा परिणाम होईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष गनी यांनी दिला.

सोमवारी सकाळच्या सुमारास अफगाणिस्तानच्या हैबाक शहरातल्या ‘एनडीएस’च्या संरक्षक भिंतीवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी प्रथम स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट घडवून आणला. या प्रचंड शक्तीशाली स्फोटानंतर तीन तालिबानी दहशतवादी एनडीएसच्या आवारात शिरले. या हल्लेखोरांमध्ये आणि सुरक्षादलांमध्ये चकमक सुरु झाली. यामध्ये १४ जण ठार झाले असून यात ११ अफगाणी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी असल्याची बातमी आहे. तसेच या हल्ल्यात ६३ जण जखमी झाले आहेत. तसेच तीनही हल्लेखोरांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.

Afganistan-Talibanयाआधी रविवारी रात्री अफगाणिस्तानच्या कुंदुझ प्रांतातील पोलीस स्टेशन आणि सरकारी कार्यालयाला तालिबानने लक्ष्य केले. यानंतर उडालेल्या चकमकीत पाच पोलीस अधिकारी आणि चार नागरिकांचा बळी गेला. यावेळी सहा दहशतवादी ठार झाले. तर त्यानंतर काही मिनिटातच तालिबानने बादाकशाह प्रांतातील अरगझखवामधल्या सुरक्षा चौकीला लक्ष्य केले. यावेळी सात पोलिसांचा बळी गेला. तर पाच दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्या आहेत.

या हल्ल्यांचा अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी कडक शब्दात निषेध नोंदविला. तालिबानने हल्ले आणि अफगाणी जनतेला लक्ष करणे थांबवावे. तालिबानने हल्ले कायम ठेवले तर याचा शांतीचर्चेवर परिणाम होईल, असा इशारा गनी यांनी दिला. २९ फेब्रुवारी रोजी तालिबान आणि अमेरिकेमध्ये शांतीकरार झाला होता. या करारानंतर काही तासातच तालिबानने अफगाणिस्तानात हल्ले घडवून आणले. तालिबानच्या हल्ल्यांचे सतत सुरु आहे . यामुळे अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमधील वाटाघाटी पुढे सरकू शकलेल्या नाहीत.

leave a reply