अफगाणिस्तानमध्ये चोवीस तासात ३०० तालिबानी ठार

  • अमेरिकी लष्कर ऑगस्ट महिन्यापर्यंत अफगाणिस्तानात असेल
  • बगराम हवाईतळावर स्थानिकांची लुटालूट

वॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत तालिबानच्या ३०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. यासाठी हवाई कारवाईचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने बगराम हवाईतळाचा ताबा सोडल्यानंतर पुढच्या काही तासात अफगाणींनी येथे घुसखोरी करून मोठी लूट सुरू केल्याच्या बातम्या आहेत.

अफगाणिस्तानातील सर्वात मोठा तळ बगरामची किल्ली अफगाणी लष्कराकडे सोपवून अमेरिकेने पूर्ण माघारीचे संकेत दिल्याचे बोलले जात होते. त्यातच अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी देखील ४ जुलै रोजीच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा अखेरचा जवान मायदेशी परतलेला असेल, असे जाहीर केले होते. अमेरिकेच्या या माघारीमुळे तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ होईल व तालिबान लवकरच अफगाणिस्तानचा ताबा घेईल, असे इशारे दिले जात होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना ४ जुलैपर्यंतच्या माघारीच्या बातम्या खोडून काढल्या.

‘अफगाणिस्तानातील पूर्ण माघारीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही’, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. त्याचबरोबर दहशतवादविरोधी युद्धात अफगाणिस्तानमधील गनी सरकार आपल्या क्षमतेचा वापर करील, असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत ही माघार पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे किमान दीड महिने तरी अमेरिकेचे जवान अफगाणिस्तानात तैनात असणार आहेत.

अमेरिका या सैन्यमाघारीनंतरही अफगाणिस्तानातील हवाई हल्ले सुरू ठेवण्यासाठी कतारमधून मोहीम राबविणार असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली. यासाठी कतारमध्ये अफगाणिस्तानसाठी स्वतंत्र लष्करी कमांड प्रस्थापित करण्याचे आदेश संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिले. बगराम हवाई तळाचा ताबा सोडल्यानंतर कतारमधून हवाई मोहीम राबविण्यात येतील, अशी माहिती किरबाय यांनी दिली.

अमेरिकेच्या लष्कराने बगराम हवाई तळाचा ताबा सोडल्यानंतर अवघ्या काही तासात स्थानिकांनी येथे घुसून लूट माजविली. स्थानिकांनी तळावरील पोलादी आणि प्लास्टिकच्या वस्तूंची लूट केल्याचे अफगाणी यंत्रणांनी स्पष्ट केले. अफगाणी लष्कराने शनिवारी सकाळी या तळाचा ताबा घेऊन स्थानिकांना पिटाळले. या घटनेनंतर बगराम तळावरील तालिबानच्या हल्ल्याची शक्यता वाढल्याचा दावा केला जातो.

leave a reply