किरगिझिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमेवरील संघर्षात ३१ जणांचा बळी

बिश्केक – गेल्या चोवीस तासात किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशांच्या सीमाभागात पेटलेल्या संघर्षात ३१ नागरिकांचा बळी गेला आहे. पाण्याच्या संघर्षावरुन पेटलेल्या या संघर्षात दोन्हीकडच्या लष्कराने गोळीबार केला तसेच तोफगोळ्यांचा मारा केला. तर दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये दगडफेकीची घटना घडल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेल्या या दोन्ही मध्य आशियाई देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या प्रश्‍नावर तणाव आहे. हा प्रश्‍न चर्चेने सोडविण्यासाठी रशियाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण गुरुवारी किरगिझिस्तानच्या पश्‍चिमेकडील कोक-ताश भागातील पाणीपुरवठ्यावरुन दोन्ही देशांच्या लष्करामध्ये गोळीबार सुरू झाला. काळाबरोबर हा संघर्ष तीव्र होऊन दोन्हीकडच्या सीमेवर रणगाडे दाखल झाले.

यावेळी दोन्ही देशांच्या लष्कराने केलेल्या गोळीबार आणि तोफांच्या हल्ल्यात ३१ जणांचा बळी गेला असून यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. याशिवाय या संघर्षात दीडशेहून अधिक जखमी झाले तर एका रात्रीत १० हजार जणांनी स्थलांतर केल्याच्या बातम्या येत आहेत. गुरुवारी रात्री किरगिझिस्तान व ताजिकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्षबंदी देखील झाली होती. पण शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाल्याचा दावा केला जातो.

या संघर्षात सीमेवरील काही इमारती, शाळा व संपत्तीचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जाते. दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा असलेल्या पाणीपुरवठ्यावरील सर्वेक्षण उपकरणे काढून टाकण्याचे मान्य झाले होते. पण ताजिकिस्तानने यातून माघार घेतल्याचा आरोप किरगिझिस्तान करीत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात येथील स्थानिकांमध्येच वाद सुरू होता. पण नंतर दोन्हीकडच्या जवानांनी यात सहभाग घेतल्यानंतर वादाचे रुपांतर संघर्षात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

१९९१ साली सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेल्या किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानची सीमारेषा पूर्णपणे निश्‍चित झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये कायम तणाव राहिलेला आहे.

leave a reply