चीनमधील राखीव साठ्यांमध्ये ३२ टन सोन्याची भर पडली

चीनच्या मध्यवर्ती बँकेचा दावा

King-World-News-Greyerzबीजिंग – गेल्या तीन वर्षात चीनने आपल्या राखीव साठ्यांमध्ये ३२ टन सोन्याची भर घातल्याची माहिती चीनच्या मध्यवर्ती बँकेने दिली. नोव्हेंबर २०२२च्या अखेरीस चीनच्या राखीव साठ्यांमध्ये १,९८० टन इतके सोने असल्याचे ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात, चीन आपल्या सोन्याच्या साठ्यांमध्ये मोठी भर टाकत असल्याचा दावा जपानमधील आघाडीच्या वेबसाईटने केला होता.

गेल्या महिन्यात ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या व्यवहारांची माहिती देणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर चीनसह अनेक देशांनी सोन्याच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचे सांगण्यात आले होते. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९९.३ टन सोन्याची खरेदी करण्यात आली. यातील सुमारे ९० टन सोने तुर्की, उझबेकिस्तान व भारताच्या मध्यवर्ती बँकांकडून खरेदी करण्यात आले होते.

CHINA GOLD RESERVESया देशांची नावे वगळता इतर देशांची नावे प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जवळपास ३०० टन सोने कोणत्या देशाने खरेदी केले, यावर तर्कवितर्क सुरू झाले होते. ‘निक्केई आशिया’ या जपानी वेबसाईटने ही खरेदी चीनकडून करण्यात आली असावी, असा दावा केला होता. चीनने ही खरेदी रशियाकडून केल्याचेही दाव्यात म्हटले होते. मात्र चीन व रशिया दोन्ही देशांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. दुसऱ्या बाजूला गेल्या काही महिन्यात चीन व रशियामधील द्विपक्षीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही समोर आले होते.

गेल्या ११ महिन्यात चीन व रशियातील व्यापार तब्बल १७२ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. हा रशिया-चीन द्विपक्षीय व्यापारातील नवा विक्रम असल्याचे म्हटले जाते. रशियातून चीनमध्ये होणारी निर्यात तब्बल ४७ टक्क्यांनी वाढून १०५ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. हा विक्रमी व्यापार व चीनमधील सोन्याच्या राखीव साठ्यांमध्ये पडलेली भर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी प्रसिद्ध होणे लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरते.

चीनच्या यंत्रणांनी यापूर्वीही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. मात्र त्याची आकडेवारी कधीच जाहीर केली नव्हती. उपलब्ध आकडेवारीनुसार चीनकडे एक हजार टनांपेक्षा अधिक सोने असल्याचे दिसून आले आहे.चीन हा सोन्याचे सर्वाधिक राखीव साठे असणारा जगातील सहाव्या क्रमांकाच देश ठरतो. मात्र सोन्याच्या बाजारपेठेशी संबंधित काही विश्लेषक तसेच वेबसाईट्सची चीनकडील राखीव सोन्याचे साठे १० हजार टनांपर्यंत असावे, असे दावे केले होते. चीन हा जगातील आघाडीच्या सोन्याच्या उत्पादकांपैकी एक असल्याकडेही या विश्लेषकांनी लक्ष वेधले होते.

leave a reply