महाराष्ट्रामध्ये चोवीस तासात कोरोनाच्या ३२ हजार रुग्णांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात चोवीस तासात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. बुधवारी महाराष्ट्रात सुमारे ३२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबई शहरात झाली आहे. देेशात सर्वात जास्त चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रात असून सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. राज्यात एका दिवसात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच ९५ रुग्ण दगावले आहेत. याआधी तीन दिवसांपूर्वी राज्यात ३० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्यावर्षी कोरोनाची साथीने शिखर गाठले असतानाही इतके रुग्ण महाराष्ट्रात आढळत नव्हते. त्यामुळे सतत चिंतेत भर पडत आहे. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी सरसकट कोरोनाचे रॅपिड टेस्टिंग सुरू झाले होताच शहरातील कोरोना रुग्णांची नोंद वाढू लागली आहे. बुधवारी मुंबईत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तसेच ६ जण या साथीने दगावले.

मात्र मुंबईत ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार नाही, असे मुंबईच्या पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याआधीच कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची संख्या ५० टक्क्यांवर आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी वर्दळ कमी करण्यासाठी उपाय केले जात आहेत. सध्या जारी केलेल्या गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन केल्यास गर्दी नियंत्रणात येऊन साथ थोपविता येईल, असा विश्‍वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

मुंबई शेजारी ठाण्यातही परिस्थिती बिकट आहे. ठाणे महापालिका क्षेत्र, नवी मुंबई, कल्या,-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, पालघर, वसई-विरार, रायगड, पनवेल आणि मुंबई महापालिका क्षेत्रात मिळून ९१४७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिक मंडळात ४१०९ नवे रुग्ण सापडले असून १२ जणांचा बळी गेला आहे. पुणे मंडळात ४ हजार ५६२ नव्या रुग्णांची नांेंद झाली आहे. यातील सर्वाधिक ३५६६ नवे रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. नागपूर मंडळात ४८३३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून नागपूर महापालिका क्षेत्रात २९६२ नव्या रुग्णांची नांेंद झाली आहे. औरंगाबाद मंडळातही २३०१ नवे रुग्ण सापडले आहेत. बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ‘लॉकडाऊन’

वेगाने वाढत असलेल्या रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात १० दिवसांचा ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ‘लॉकडाऊन’ असणार असल्याची घोषणा जिल्ह्या प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. याआधी नागपूरमध्येही ‘लॉकडाऊन’ लावण्यात आला होता.

राज्यात कोरोनाची साथ थोपविण्यासाठी विविध जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर निर्णय घेत आहेत. काही जिल्हा क्षेत्रात अशंता ‘लॉकडाऊन’, नाईट कर्फ्यू व इतर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तर राज्यातील काही जिल्हा प्रशासनांकडून ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेण्यात येत आहे. बीड आणि नांदेड जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे.

याकाळात बीड व नांंदेडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनांच रस्त्यावर वाहतुकीची परवानगी असेल. गेल्यावर्षी २४ मार्च रोजीच देशभरात पहिल्यांदा ‘लॉकडाऊन’ लावावा लागला होता. त्यानंतर देशात पुन्हा काही भागांमध्ये ‘लॉकडाऊन’ची वेळ आली आहे. केंद्र सरकारने सरसकट राज्यभरात ‘लॉकडाऊन’ला विरोध केला आहे. त्यापेक्षा जास्त रुग्ण असलेल्या भागांमध्ये कंटेनमेंन्ट झोन बनवा, असे निर्देश राज्यांना दिले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील भोपाळसह चार शहरांमध्येही ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला आहे.

leave a reply