चीनच्या घुसखोरीविरोधात फिलिपाईन्सला जपान आणि ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

मनिला – ‘साऊथ चायना सी क्षेत्रात तणाव वाढविणार्‍या कुठल्याही प्रकारच्या कारवायांना जपानचा विरोध असेल’, असे फिलिपाईन्समधील जपानचे राजदूत ‘कोशिकवा काझुहिको’ यांनी बजावले आहे. फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात आपली २२० जहाजे पाठवून तणाव माजविणार्‍या चीनला उद्देशून जपानच्या राजदूतांनी हा इशारा दिल्याचे उघड होत आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने जपान हा या क्षेत्राच्या बाहेरील देश असल्याची टीका केली. तसेच जपानसारखे त्रयस्थ देशच या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा ठपका चीनने ठेवला आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून चीनच्या २२० जहाजांनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली आहे. फिलिपाईन्सच्या ‘जुलियन फिलिप’ या द्विपाच्या हद्दीत नांगर टाकल्याचा आरोप फिलिपाईन्सने काही दिवसांपूर्वी केला होता. या जहाजांमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले मिलिशिया अर्थात सशस्त्र दल असल्याचा आरोप फिलिपाईन्सच्या सरकारने केला. गेल्या आठवड्यात फिलिपाईन्सच्या लष्कराने या चिनी मिलिशिया जहाजांचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. तर आता फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीतील चिनी जहाजांच्या घुसखोरीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर आले आहेत.

चिनी जहाजांच्या या घुसखोरीवर फिलिपाईन्समधील जपाने राजदूत काझुहिको यांनी टीका केली. ‘आंतरराष्ट्रीय सागरी नियमांना जपानचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याचबरोबर स्वतंत्र, मुक्त आणि शांतीपूर्ण सागरी क्षेत्रासाठी जपान प्रयत्नशील आहे. तसेच या क्षेत्रातील फिलिपाईन्सच्या अधिकारांना जपानचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे काझुहिको यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले.

जपानसह अमेरिका व ऑस्ट्रेलियाने देखील चिनी जहाजांच्या या क्षेत्रातील घुसखोरीवर टीका केली. ‘इतर देशांना चिथावणी आणि धमकावण्यासाठी चीन नेहमीच मिलिशिया जहाजांचा वापर करतो. या जहाजांमुळे या क्षेत्रातील शांती व सुरक्षा धोक्यात येत आहे’, असे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे.

‘सुरक्षित, मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्राला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा असेल. अतिशय महत्त्वपूर्ण सागरी महामार्ग असलेला साऊथ चायना सीतील वाहतूक आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारीत असावी. अशा या सागरी क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करणार्‍या कारवाया वाद चिघळवू शकतात’, असा इशारा फिलिपाईन्समधील ऑस्ट्रेलियन राजदूत स्टिव्हन रॉबिनसन यांनी दिला.

फिलिपाईन्समधील चीनच्या दूतावासाने जपानच्या आक्षेपांना प्रत्युत्तर दिले. साऊथ चायना सीवर अधिकार असणारा चीन या क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील घडामोडींमध्ये बाहेरील देशांनी नाक खुपसून कुजकट राजकीय डावपेच वापरू नये’, असा टोला चीनच्या दूतावासाने लगावला. तसेच अमेरिकेचा अंकित बनलेला जपान अधिकच हीन पातळीवर जात असल्याचा ठपका चिनी दूतावासाने ठेवला.

जपानचे घृणास्पद वर्तन या क्षेत्राचे लचके तोडण्याच्या तयारीत असलेल्या लांडग्याला आमंत्रित करीत आहे, असे सांगून चिनी दूतावासाने अप्रत्यक्षपणे अमेरिकेलाही लक्ष्य केले. या शाब्दिक चकमकी झडत असताना, चीनने फिलिपाईन्सच्या ‘स्प्रार्टले’ द्विपसमुह क्षेत्रातील कृत्रिम बेटांवरील बांधकाम वाढविल्याची माहिती समोर येत आहे.

आपल्या सागरी क्षेत्रात चीनच्या जहाजांनी केलेल्या घुसखोरीनंतर फिलिपाईन्सने आपल्या सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी नौदलाची गस्त सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या क्षेत्रात संघर्षाची ठिणगी पडू शकते, अशी दाट शक्यता समोर येत आहे. तसे झाले तर जपान व ऑस्ट्रेलिया हे देश फिलिपाईन्सच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अमेरिकेनेही चीनवर टीका करून आपला या घुसखोरीला विरोध असेल, असा संदेश दिला आहे.

ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर चीन बेलगाम बनला असून म्यानमारपासून ते फिलिपाईन्सपर्यंत चीनच्या आक्रमकतेमध्ये झालेली वाढ जगभरातील विश्‍लेषकांचे लक्ष वेधून घेत आहे. चीनला रोखण्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष पूर्णपणे अपयशी ठरू लागल्याची टीका यामुळे अधिकच तीव्र होऊ शकते. आजवर बायडेन यांचे समर्थन करणार्‍यांनाही यापुढे चीनच्या मुद्यावर त्यांचा बचाव करणे अधिकाधिक अवघड बनत चालल्याचे दिसत आहे.

leave a reply