महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे ३२८ नवे रुग्ण

मुंबईत चोवीस तासात १८४ रुग्ण आढळले

मुंबई, दि. १८  (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून शनिवारी राज्यात ११ रुग्ण दगावले, तर ३२८ नवे रुग्ण आढळले. मुंबईत एका दिवसात या साथीच्या आतापर्यंतच्या सर्वात जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली.  शनिवारी मुंबईतच १८४ रुग्ण नवे सापडले.  गेल्या दोन दिवसात राज्यात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र शनिवारी यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून ३६४८ वर पोहचली आहे. मुंबईत आणि पुण्यात सर्वाधिक रुग आढळले आहेत. मुंबईत १८४, तर पुण्यात ७४ रुग्णांची नोंद झाली. मुंबई शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. दादर परिसरात शनिवारी आणखी एक रुग्ण आढळला. मुंबईतील ८ वार्डांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळूत आहेत. ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. मीरा भाईंदरमध्ये ११, पालघरमध्ये ७, ठाणे शहरात ६, भिवंडीत ३ रुग्ण आढळले आहेत.  रायगड जिल्ह्यात ५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान राज्य सरकारने  २० एप्रिल नंतर काही भागात कारखाने सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र सर्व नियमांच्या काटेकोर पालन करण्याकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. तर हॉटस्पॉट ठरत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन अधिक सक्तीने पालन करण्याकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे.

leave a reply