एकाच दिवसात जगभरात कोरोनाव्हायरसचे ३७०० बळी

वॉशिंग्टन – जगभरातील १९९ देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाव्हायरसने ३९ हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला असून गेल्या चोवीस तासात ही बळींची संख्या ३,७३४ ने वाढली आहे. दिवसभरात या साथीचे सुमारे ६० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. इटलीमध्ये या साथीचे सर्वाधिक बळी गेले असून सलग तिसर्या दिवशी अमेरिकेतील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये हजारोंच्या संख्येने वाढ झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये कोरोनाव्हायरसचे ११,५९१ बळी गेले. गेल्या चोवीस तासात इटलीत ८१२ जणांचा बळी गेला असून यामध्ये अकरा डॉक्टर्सचा समावेश असल्याची माहिती इटलीच्या सरकारने दिली. गेल्या महिन्याभरात इटलीमध्ये रुग्णांची सेवा करताना ६६ डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. सोमवारी इटलीत चार हजार नवे रुग्ण आढळले असून इटलीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे.

 

गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये ८४९ जणांचा बळी गेला असून या देशात एकूण ८,१८९ जण दगावले आहेत. स्पेनमधील माद्रिद शहरात सर्वाधिक ३,६०९ बळींच समावेश आहे. स्पेनच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात ९,२२२ नवे रुग्ण आढळले आहेत. लवकरच प्रति दिनी ५० हजार जणांची तपासणी करण्यात येईल, असे स्पेनच्या सरकारने म्हटले आहे. सध्या स्पेनमध्ये दिवसाला २० हजार जणांची कोरोना तपासणी केली जाते. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ स्पेनला वैद्यकीय सहाय्य पुरविणार आहे.

फ्रान्समध्ये गेल्या चोवीस तासात सहाशेहून अधिक जण दगावले तर चार हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मास्क आणि व्हेन्टिलेटर्सच्या निर्मितीसाठी चार अब्ज युरोची घोषणा केली आहे. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये जवळपास दोनशे रुग्णांचा बळी गेला असून अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. युरोपमधील इतर देशांप्रमाणे ब्रिटनमध्ये कोरोनाग्रस्तांना ठेवण्यासाठी रुग्णालये कमी पडत असून शॉपिंग सेंटर्समध्ये तात्पुरती रुग्णालय उभारली जात आहेत.

गेल्या चोवीस तासात अमेरिकेमध्ये या साथीने ६८७ जणांचा बळी घेतला असून या देशात एकूण ३१७७ जण दगावले आहेत. तर या एका दिवसातच अमेरिकेत २२ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. अमेरिका प्रति दिन एक लाख जणांची तपासणी करीत असल्यामुळे कोरोनग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याआधीच जाहीर केले होते. अमेरिकेत १,६४,६६५ जणांना या साथीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून न्यूयॉर्कमध्ये ७५ हजार जणांचा समावेश आहे. तर न्यूयॉर्क पोलीसमधील ११९३ जणांना या साथीची लागण झाल्याचे उघड झाले आहे.


leave a reply