ट्युनिस – ट्युनिशिआ व मोरोक्कोच्या सागरी क्षेत्रात तीन बोटी उलटून झालेल्या दुर्घटनेत 38 निर्वासितांचा बळी गेला असून काहीजण बेपत्ता आहेत. शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांमध्ये या दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ट्युनिशिआच्या सागरी क्षेत्रात जवळपास दहा बोटी उलटल्याचे समोर आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात इटलीच्या दक्षिण भागातील कॅलाब्रिआ प्रांतात झालेल्या जहाज दुर्घटनेत सुमारे 90 निर्वासितांचा बळी गेला होता. या दुर्घटनेने आफ्रिकेतून युरोपिय देशांमध्ये बेकायदेशीररित्या घुसणाऱ्या निर्वासितांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर ट्युनिशिआत सातत्याने घडणाऱ्या दुर्घटना लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत.
ट्युनिशिआतून इटलीत जाणाऱ्या आफ्रिकी निर्वासितांचा समावेश असलेल्या बोटी एस्फॅक्स जवळील सागरी क्षेत्रात उलटल्याची माहिती ट्युनिशिआच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही बोटींमध्ये किमान 70 निर्वासित असल्याची माहिती मिळाली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे सुरक्षायंत्रणांकडून सांगण्यात आले. ट्युनिशिआला जोडून असलेल्या मोरोक्कोच्या सागरी क्षेत्रातही बोट उलटली असून 11 निर्वासित बुडाल्याचे उघड झाले आहे.
आफ्रिकेतील लिबिया व ट्युनिशिआ या देशांमधून युरोपिय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासितांचे लोंढे घुसत आहेत. लिबियाच्या तटरक्षक दलाने गेल्या काही महिन्यात निर्वासितांच्या बोटींविरोधात आक्रमक कारवाईची मोहीम राबविली आहे. त्यामुळे निर्वासितांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी आपला मोर्चा ट्युनिशिआकडे वळविल्याचे समोर येत आहे.