काश्मीरमधील चकमकीत लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहिद

'लश्कर'चा कमांडर ठार

नवी दिल्ली/श्रीनगर – काश्मीरच्या हंडवारा भागात दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह पाच जवानांना वीरमरण आले. दोनवेळा सेनापदक मिळविलेले कर्नल आशुतोष शर्मा या चकमकीत शहिद झाले. पाच वर्षात पहिल्यांदाच एखाद्या चकमकीत इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला वीरमरण आले आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करताना कर्नल शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी अतुलनीय शौर्य दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिदांना आदरांजली वाहून देश त्यांचे बलिदान विसरणार नाही असे म्हटले आहे. देशभरातील जनता या शहिदांप्रती आदर व्यक्त करीत असून, त्याचवेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात संतापाची तीव्र लाट भारतीयांमध्ये उसळल्याचे दिसत आहे.

काश्मीरच्या हंडवारा येथे दहशतवाद्यांच्या हालचालींची खबर सुरक्षादलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी या भागात सुरक्षादलांनी एक संयुक्त मोहीम हाती घेतली. वेगवेगळी पथके यासाठी तयार करण्यात आली. शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली. मात्र येथून दहशतवाद्यांना निसटण्यास यश मिळाले. याच दहशतवाद्यांचा शोध घेताना कर्नल आशुतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथक हंडवारातील एका घरापर्यंत पोहोचले. येथील संशयित हालचाली लक्षात येताच या पथकाने आजूबाजूच्या साऱ्या परिसरातील नागरिकांना येथून बाहेर काढले. तसेच दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी कर्नल शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लान्सनायक दिनेश आणि पोलीस उपनिरीक्षक शकील काझी यांनी जीवाची पर्वा न करता या घरात प्रवेश केला.

सुरक्षादलाचे जवान घरात शिरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. या गोळीबारादरम्यानही जवानांनी घरातील सर्वांची सुखरूप सुटका केली. पण गोळी लागल्याने कर्नल शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लान्सनायक दिनेश आणि पोलीस उपनिरीक्षक शकील काजी यांना वीरमरण आले. येथून दहशतवाद्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेर असलेल्या दुसऱ्या पथकाने दोन दहशतवाद्यांना जागीच ठार केले. दोन दहशतवादी शेजारील जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले. यानंतर या भागात व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो ‘लश्कर-ए-तोयबा’चा वरिष्ठ कमांडर हैदर असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. काश्मीरमधील ज्या जंगल क्षेत्राजवळ ही चकमक झाली, तो भाग कुपवाड्याच्या नियंत्रण रेषेजवळ आहे. येथे नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करून भारतीय सीमेत दाखल झालेल्या दहशतवाद्यांना स्थानिक दहशवादी आणि छुप्या सहाय्यकांची पहिली मदत मिळते, असे मानले जाते. त्यामुळे हे दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी ठरलेल्या दहशतवाद्यांना येथे भेटण्यासाठी आले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो.

नियंत्रण रेषेपलीकडे सुमारे ४५० दहशतवादी घसखोरीस तयार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर दोनच आठवड्यात दहशतवाद्यांची संख्या दुप्पट झाल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनीही पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सातत्याने संघर्षबंदीचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना दहशतवादी गटांनी आखल्याचे वृत्तही आले होते. दरम्यान ‘लश्कर-ए-तोयबा’च्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे.

leave a reply