अबुजा – नायजेरियात ‘आयएस’संलग्न ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेला आहे. गेल्या आठवड्यात नायजेरियाच्या लष्कराने केलेल्या एका कारवाईत बोको हरामचे दोन कमांडर्स ठार झाले होते. त्याचा सूड घेण्यासाठी चढविलेल्या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. बळी गेलेल्यांमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश असून ते लष्कराला माहिती देत असल्याचा दहशतवाद्यांना संशय होता, असा दावाही स्थानिक माध्यमांनी केला आहे.
रविवारी नायजेरियाच्या ईशान्य भागात असलेल्या बोर्नो प्रांतात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी रान या शहरातील एका भागात अंदाधुंद गोळीबार केला. बळी गेलेल्यांमध्ये व्यापारी तसेच शेतकऱ्यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांकडून लष्कराला माहिती दिली जात असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यात नायजेरियात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने आपला प्रभाव वाढविण्यासाठी विविध प्रांतांमध्ये हत्याकांड सुरू केल्याचे समोर येत आहे. नायजेरियातील सुरक्षायंत्रणांपासून अनेक महत्त्वाच्या जागांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात नायजेरियाच्या प्लॅटू प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 150 जणांचा बळी गेला होता. त्यापूर्वी मार्च महिन्यात रेल्वेगाडी तसेच विमानतळावर दहशतवादी हल्ले करण्यात आले होते.
एकापाठोपाठ होणाऱ्या हल्ल्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधी पक्षांनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे. संरक्षणमंत्री तसेच सुरक्षायंत्रणांच्या प्रमुखांनी राजीनामे द्यावेत, असेही विरोधकांनी आपल्या मागणीत म्हटले आहे.
आफ्रिकेतील नायजेरिया हा इंधनसंपन्न व सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. गेली काही वर्षे अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी संघटना तसेच बंडखोर गट आणि लुटारुंच्या टोळ्यांनी या देशाची सुरक्षा धोक्यात टाकली आहे. सातत्याने कारवाया करूनही दहशतवादी तसेच सशस्त्र गटांवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे देशाचे स्थैर्य धोक्यात आल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे.