दक्षिण सुदानमधील वांशिक संघर्षात ५६ जणांचा बळी

sudan burning दर्फूर – दक्षिण सुदानच्या जाँगलेई भागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात किमान ५६ जणांचा बळी गेला आहे. दक्षिण सुदानमधील वांशिक संघर्ष नियंत्रणाबाहेर जात असून येथील सरकारही यात अपयशी ठरल्याचा दावा केला जातो. गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत दक्षिण सुदानमधील वांशिक संघर्षाचा मुद्दा उपस्थित करुन त्यावर चिंता व्यक्त केली होती.

दक्षिण सुदानमधील जाँगलेई प्रांतात न्यूअर आणि मुरले या दोन समुदायांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वांशिक संघर्ष पेटला आहे. प्रादेशिक वर्चस्वासाठी सुरू असलेल्या या संघर्ष राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातून आवाहन केले जात आहे. पण दोन्ही समुदायांमधील संघर्ष थांबलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून जाँगलेईच्या पूर्वेकडील भागात या दोन्ही समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात ५६ जणांचा बळी गेला. यामध्ये न्यूअर समुदायाच्या ५१ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Jikany Nuer White Army fighters holds their weapons in Upper Nile State, South Sudanगेल्या आठवड्यातच या संघर्षासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती या भागात तैनात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसैनिकांनी दिली होती. पण दक्षिण सुदानमधील वांशिक वाद अगदी टोकाला पोहोचला असून सरकार तसेच आंतरराष्ट्रीय शांतीसैनिकांचे प्रयत्न देखील अपूरे पडत आहेत. त्यातच येथील टोळ्यांना मिळणारा शस्त्रसाठा दक्षिण सुदानमधील संघर्षात वाढ करीत आहे. त्यामुळे दक्षिण सुदानमध्ये स्थैर्य प्रस्थापित होणे अवघड बनले आहे.

२०११ साली सुदानचे विभाजन झाल्यानंतर दक्षिण सुदानला स्वातंत्र्य मिळाले. या विभाजनामुळे दक्षिण सुदानमधील गटांचे वाद संपुष्टात येतील, असा दावा करण्यात आला होता. पण गेले दशकभर दक्षिण सुदान अस्थैर्याला सामोरे जात असून यासाठी या देशातील वांशिक संघर्ष सर्वाधिक जबाबदार असल्याची टीका होत आहे. जमिनीपासून पशूधनावरील अधिकारांपर्यंत या देशात संघर्ष भडकल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

leave a reply