काबुल – अफगाणिस्तानच्या कंदहार, कुंदूझ आणि उरूझ्गन प्रांतात अफगाण लष्कर आणि तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षात ५३ दहशतवादी आणि १३ अफगाण जवानांचा बळी गेला. या आठवडाभरात अफगाण लष्कर आणि तालिबानमध्ये पेटलेला हा दुसरा मोठा संघर्ष ठरतो.
अफगाणिस्तानच्या सुरक्षेला आव्हान देऊन सुरक्षा तसेच सरकारी अधिकार्यांवर हल्ले चढविणार्या तालिबानी दहशतवाद्यांविरोधात अफगाण लष्कराने मोहीम छेडली आहे. गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने कंदहार प्रांतातील अरघांदाब आणि खाकरेझ या जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत ५३ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले. अफगाणी लष्कराच्या या कारवाईत १५ दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील अफगाणी लष्कराने कंदहार प्रांतातच तालिबानच्या दहशतवाद्यांवर हल्ले चढविले होते.
कंदहार प्रांतात अफगाणी लष्कराला यश मिळाले असले तरी कुंदूझ आणि उरूझ्गन प्रांतात अफगाणी लष्कराला जीवितहानी सोसावी लागली आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कुंदूझ प्रांतातील सुरक्षा चौकीवर तालिबानी दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात अफगाणी लष्कराच्या सात जवानांचा बळी गेला. या व्यतिरिक्त तालिबान्यांनी नऊ जवानांचे अपहरण केले असून यामध्ये दोन वरिष्ठ लष्करी अधिकार्यांचा समावेश असल्याचे मुजाहिदने सांगितले. तर उरूझ्गन प्रांतात तालिबानने लष्कराच्या तळाजवळ घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा जवानांचा बळी गेल्याचे स्थानिक प्रांताधिकार्याने स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद याने अमेरिका तालिबानच्या ठिकाणांवर चढवित असलेल्या हवाई हल्ल्यांवर आक्षेप घेतला होता. अफगाणी लष्कराला सहाय्य करण्यासाठी अमेरिका चढवित असलेले हवाई हल्ले म्हणजे तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेत ठरलेल्या कलमांचे उल्लंघन असल्याचा आरोप तालिबानने केला होता. तर अफगाणी जनता व जवानांच्या सुरक्षेसाठी हवाई हल्ले यापुढेही सुरू राहतील, असे अमेरिकेने ठणकावले होते.