अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पाकिस्तानसाठी पुरस्कार ठरेल

- अफगाणिस्तानच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा इशारा

काबुल – अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेऊ नये, ही मागणी अफगाणिस्तानात जोर पकडत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारबाबत घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या फायद्याचा ठरू शकतो, असा इशारा अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबील यांनी दिला. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानातून माघार घेताच पाकिस्तान आमच्या देशात दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी नवे तळ सुरू करील, असा दावा नबील यांनी केला. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्याच एका नेत्याने पाकिस्तानी लष्कर आणि कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ तालिबानला हत्यारासारखे वापरीत असल्याचा आरोप केला होता.

कतारची राजधानी दोहा येथे अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वाटाघाटींच्या दुसर्‍या टप्प्याचे स्वागत केले आहे. या वाटाघाटींमुळे अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित होईल, असा दावा पाकिस्तान करीत आहे. पण पाकिस्तानचे हे दावे म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सुरू असलेला देखावा असल्याचा आरोप अफगाणिस्तानचे नेते आणि गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबील यांनी केला.

तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे किंवा पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे अफगाणिस्तानात शांती व स्थैर्य प्रस्थापित होणार नसल्याचे नबील यांनी अमेरिकी साप्ताहिकातील आपल्या लेखात म्हटले?आहे. कारण तालिबानने या शांतीचर्चेत सहभाग घेतला असला तरी या वाटाघाटींमुळे अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानचेच अधिक भले होईल, अशी चिंता नबील यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध छेडल्यापासून पाकिस्तान त्याचा फायदा उचलित असल्याचा आरोप नबील यांनी केला.

‘गेल्या वीस वर्षांमध्ये दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानने अत्यंत चलाखीने अमेरिकेतील रिपब्लिक आणि डेमोक्रॅटच्या प्रशासनाला खेळविले. आता देखील तालिबानबरोबरच्या शांतीचर्चेत बर्‍याच त्रुटी आहेत. तरी देखील आपल्या फायद्यासाठी पाकिस्तान ही शांतीचर्चा यशस्वी व्हावी म्हणून धडपडत आहे’, असे नबील पुढे म्हणाले.

मुख्य म्हणजे अमेरिका आणि अफगाण सरकारसह शांतीचर्चा करणारे तालिबानचे प्रतिनिधी आणि अफगाणिस्तानात हिंसाचार घडविणारे तालिबानचे दहशतवादी कमांडर यांच्यात कुठलाही संबंध आणि संपर्क नसल्याचा दावा नबील यांनी केला. त्यामुळे कतार येथील शांतीचर्चा यशस्वी ठरली, तालिबानच्या प्रतिनिधींनी हिंसाचार थांबविण्याचे आश्‍वासन दिले तरी त्याची अंमलबजावणी होणार नाही. अशा परिस्थितीत, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली तर ते पाकिस्तानसाठी पारितोषिक ठरेल, असा इशारा नबील यांनी दिला.

अमेरिकेच्या या सैन्यमाघारीबरोबर पाकिस्तान तालिबानला हाताशी धरून अफगाणिस्तानवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू करील. त्याचबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचे नवे प्रशिक्षण तळ उभारून या क्षेत्राला अधिकाधिक अस्थिर करील. या क्षेत्रात अस्थैर्य राहणेच पाकिस्तानच्या हिताचे आणि म्हणून पाकिस्तानचे हेच ध्येय असल्याचा ठपका नबील यांनी ठेवला.

ही शांतीचर्चा यशस्वी ठरल्याचा देखावा उभा करण्यासाठी पाकिस्तान तालिबानच्या मार्फत अल-कायदाच्या काही वरिष्ठ नेत्यांची माहिती देखील उघड करील. अल कायदाचे दहशतवादी मारलेही जातील किंवा त्यांना अटक देखील होईल. याद्वारे पाकिस्तान दहशतवादविरोधी युद्धातील आपले महत्त्व वाढविण्याचा, अमेरिकेचा विश्‍वास जिंकण्याचा प्रयत्न करील. असे झाल्यास पाकिस्तानला अफगाणिस्तानात हस्तक्षेप करणे अधिक सोपे होईल, असा निष्कर्ष नबील यांनी आपल्या लेखात मांडला. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात सिरियासारखे गृहयुद्ध पेट घेईल. अफगाण लष्कर, तालिबान, आयएस आणि इतर पाकिस्तानसंलग्न दहशतवादी संघटनांमध्ये संघर्ष भडकेल, असा इशाराही नबील यांनी दिला.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेऊ नये, तालिबानबरोबर संघर्षबंदी करू नये, अशी मागणी अफगाणिस्तानचे नेते व जनता गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. तालिबानचा वापर करून पाकिस्तान अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेईल, असा दावाही अफगाणी नेते करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी देखील पाकिस्तान तालिबानला शस्त्रपुरवठा करीत असल्याचा आरोप केला होता. तर या क्षेत्रातील सामरिक आघाडीसाठी पाकिस्तानला अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवायचे आहे. म्हणूनच पाकिस्तान तालिबानचा वापर शस्त्रासारखा करीत असल्याचा आरोप पाकिस्तानचे माजी संसद सदस्य खटक यांनी केला होता.

leave a reply