काठमांडू – नेपाळची राजधानी काठमांडूहून पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवासी विमानाला झालेल्या भीषण अपघातात 68 जणांचा बळी गेला. बळींमध्ये पाच भारतीयांचा समावेश असून इतर देशांचे दहा नागरिक यात दगावले आहेत. या अपघातानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघात झालेला पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ नेपाळने चीनच्या सहाय्याने उभारला होता व दोन आठवड्यांपूर्वी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते.
नेपाळच्या येती एअरलाईन्सचे ‘9एन-एएनसीएटीआर-72’ प्रवासी विमानाने काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दहा वाजून 33 मिनिटांनी पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण केले. पण हे विमान पोखरामधील जूने विमानतळ आणि नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या मध्ये असलेल्या सेती गंडकी नदीच्या भागात दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानाला भीषण आग लागून ते कोसळल्याचे व्हिडिओज् देखील प्रसिद्ध झाले आहेत.
या भीषण अपघातात 68 प्रवासी दगावले असून मृतांमध्ये 10 परदेशी नागरिकांसह तीन नवजात मुले होती. या अपघातात 53 नेपाळी, पाच भारतीय आणि दहा इतर देशांचे प्रवासी होते, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हा अपघात कशामुळे झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विमान कोसळण्याच्या काही सेकंद आधीपर्यंत विमानतळाच्या संपर्कात होते अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांच्या हस्ते पोखरा विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. या विमानतळाचे बांधकाम चीनने केले आहे. या अपघातानांतर पंतप्रधान प्रंचड यांनी तातडीने सरकारी यंत्रणांना बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यांच्या समितीची स्थापना करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
नेपाळमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघातानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावर शोक व्यक्त केला आहे. नेपाळमधील भारतीय दूतावास तिथल्या प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. गेल्या तीन वर्षांत नेपाळमध्ये पाच विमानांचा अपघात झाला असून यात 350हून अधिक जणांचा बळी गेला आहे.