भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धासाठी सज्ज रहावे भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धासाठी सज्ज रहावे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा संदेश

बंगळुरू – युक्रेनच्या युद्धापासून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इतर सुरक्षाविषयक उलथापालथींपासून धडे घेऊन भारतीय लष्कराने आपली क्षमता अधिकाधिक प्रमाणात वाढवावी. भारतीय लष्कराने भविष्यातील युद्धासाठी सज्ज राहिले पाहिजे, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला. त्याचवेळी बदल स्वीकारण्याची व त्यानुसार आवश्यक त्या गोष्टी आत्मसात करण्याच्या भारतीय लष्कराच्या क्षमतेची संरक्षणमंत्र्यांनी प्रशंसा केली. 75 व्या लष्कर दिनाच्या निमित्ताने बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या समारोहात संरक्षणमंत्री बोलत होते. भारतीय लष्कराने आत्तापर्यंत देशासमोर खड्या ठाकलेल्या सर्वच आव्हानांचा मोठ्या धैर्याने सामना केलेला आहे, अशी प्रशंसा संरक्षणमंत्र्यांनी केली. तर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी यावेळी भविष्यातील युद्धासाठी भारतीय लष्कर स्वस्तःला सुसज्ज करीत असल्याची ग्वाही दिली.

Indian Army-future warबंगळुरूच्या ‘आर्मी सर्व्हिस कॉर्प्स-एएससी’मध्ये 75व्या लष्कर दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी जगभरातील समाज, राजकारण व अर्थकारणात फार मोठे बदल होत असल्याचा दावा केला. त्याबरोबरच जगभरातील सुरक्षाविषयक आव्हानांमध्येही मोठे बदल झाले आहेत, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी ड्रोन्स, अंडरवॉटर ड्रोन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारलेली शस्त्रे यांचा वापर सुरू झाला असून यामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. अशा परिस्थितीत उद्याच्या काळात होणाऱ्या युद्धांसाठी आपली क्षमता अधिकाधिक प्रमाणात विकसित करीत राहणे लष्कराला भाग आहे. जगभरात प्रमुख देशांच्या लष्करांकडून नवनवीन शस्त्रास्त्रांबरोबरच, नवे डावपेच व युद्धतंत्रांवर काम केले जात आहे. या आघाडीवर भारतीय लष्कराला मागे राहून चालणार नाही, असा संदेश यावेळी राजनाथ सिंग यांनी दिला.

भविष्यात समोर येऊ शकणाऱ्या या आव्हानांचा विचार करून भारतीय लष्कराला योग्य ती पावले उचलावी लागतील, असे राजनाथ सिंग पुढे म्हणाले. मात्र हे बदल स्वीकारण्याची व त्यानुसार आवश्यक ते कौशल्य विकसित करण्याची जबरदस्त क्षमता भारतीय लष्कराकडे आहे, ही बाब संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केली. इतकेच नाही तर 1962, 1965, 1971, 1999 सालातील युद्धांबरोबरच गलवान खोरे आणि तवांगच्या एलएसीवर भारतीय लष्कराने दाखविलेल्या शौर्याचा संरक्षणमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

भारतीय लष्कराच्या या पराक्रमामुळे साऱ्या जगात भारताबद्दलचा आदर वाढलेला असून भारतीयांचा आपल्या लष्करावरील विश्वास यामुळे अधिकच दृढ झाला आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. यावेळी बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी देखील बदलत्या काळातील सुरक्षाविषयक आव्हानांमध्ये झालेल्या बदलांची नोंद केली. रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये लष्करी व नागरी वापरांसाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा विध्वंसक वापर झाला, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. तसेच प्रचारयुद्धाचे महत्त्व देखील यामुळे अधोरेखित झाले असून सायबर व अंतराळ क्षेत्र नवी रणभूमी म्हणून विकसित होत असल्याची बाब यावेळी लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी मांडली. तसेच ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा देखील भारताच्या लष्करप्रमुखांनी आवर्जुन उल्लेख केला.

सध्या चीन तैवानच्या विरोधात ‘ग्रे झोन’ युद्धतंत्राचा वापर करीत आहे. यात थेट युद्ध न पुकारता वारंवार शत्रूच्या हद्दीत घुसखोरी करून प्रतिकार होण्याच्या आत माघार घेण्याच्या डावपेचांचा समावेश असतो. सततच्या या घुसखोरीमुळे शत्रूला बेजार करून आकस्मिक हल्ला चढविण्याचे धोरण या प्रकारच्या युद्धतंत्रात वापरले जाते. चीनकडून तैवानच्या विरोधात वापरल्या जाणाऱ्या या डावपेचांचा भारताच्या लष्करप्रमुखांनी केलेला उल्लेख लक्षणीय ठरतो. याबरोबरच थेट युद्धाइतकेच अप्रत्यक्ष किंवा कमी तीव्रतेचे युद्धतंत्र देखील तितकेच घातक असल्याची जाणीव यावेळी लष्करप्रमुखांनी करून दिली.

मात्र भारतीय लष्कराला या नव्या आव्हानांची पूर्णपणे जाणीव असून लष्कर यासाठी सज्ज असल्याची ग्वाही जनरल पांडे यांनी देशाला दिली आहे.

leave a reply