इराण-सौदी परस्परांच्या देशात दूतावास सुरू करणार

- इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

बैरूत – सौदी अरेबिया व इराणने नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली आहेत. या सहकार्याचे पुढील पाऊल लवकरच उचलले जाईल व सौदी आणि इराण परस्परांच्या राजधानीत आपले दूतावास सुरू करतील, अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दोल्लाहियान यांनी केली. त्याचबरोबर लवकरच आपण सौदीचा दौरा करणार असल्याची माहितीही इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच सौदीची राजधानी रियाध येथील इराणच्या दूतावासाचे दरवाजे सात वर्षात पहिल्यांदाच खुले करण्यात आले होते. त्यानंतर इराणचा सौदीतील दूतावास लवकरच सुरू होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. शनिवारी लेबेनॉनची राजधानी बैरूत येथे माध्यमांशी बोलताना इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राजदूत सुरू करण्याची घोषणा केली.

चीनच्या मध्यस्थीने सौदी व इराणमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. असे असले तरी जोवर हे देश परस्परांच्या देशात आपले दूतावास सुरू करीत नाहीत, तोपर्यंत या चर्चेला यश मिळाल्याचा दावा करता येणार नाही, असे काहीजणांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली घोषणा महत्त्वाची ठरते.

२०१५ साली धार्मिक नेत्याच्या हत्येनंतर इराण व सौदीमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. यानंतर इराणमधील सौदीच्या दूतावासावर हल्ले झाले होते. सौदीपाठोपाठ आखातातील इतर अरब मित्रदेशांनीही इराणबरोबरच्या संबंधातून माघार घेतली होती. सिरिया, इराक, येमेन या देशांमध्ये इराण व सौदी अरेबियाचे अप्रत्यक्ष युद्ध सुरू होते. येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदीमध्ये क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले, त्यामागे इराणचा हात असल्याचा आरोप झाला होता. मात्र चीनच्या मध्यस्थीने इराण व सौदीमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर, हे छुपे युद्ध थांबल्याचे दिसते आहे.

अमेरिकेने आखाती क्षेत्राबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे इराण व सौदी यांनी एकत्र येण्याची तयारी केल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. इराणशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्याआधी सौदीने अमेरिकेला धक्के देणारे काही निर्णय घेतले होते. यामध्ये चीनच्या युआन चलनात इंधनाची विक्री करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. याबरोबरच इंधनाच्या उत्पादनात कपात करण्याच्या ओपेक प्लस संघटनेच्या निर्णयामागे देखील सौदी असल्याचे बोलले जाते. हे दोन्ही निर्णय अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला धक्का देणारे ठरतात.

याच्या पाठोपाठ सौदीने एससीओमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखविली होती. त्यानंतर सौदीने इराणबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली करून यासाठी चीनची मध्यस्थी स्वीकारली. याद्वारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून आपल्याला लक्ष्य करू पाहणाऱ्या ज्यो बायडेन यांना सौदी अरेबियाने हादरविल्याचे दिसते आहे.

leave a reply