अमेरिकेची ‘बंकर बस्टर’ बॉम्बने सज्ज विमाने आखातासाठी रवाना

- ऑईल टँकरचा ताबा घेणाऱ्या इराणला अमेरिकेचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हवाईदलाची ‘ए-१० वॉरथॉग्स’ विमाने आखातातील तैनातीसाठी रवाना झाली आहेत. डोंगरातील किंवा भूमिगत तळ नष्ट करणाऱ्या ‘बंकर बस्टर’ बॉम्बने सदर विमाने सज्ज असल्याची माहिती अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली. या नव्या तैनातीमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण दोन दिवसांपूर्वीच इराणने ह्युस्टनसाठी रवाना झालेला ऑईल टँकर ताब्यात घेतले होते. त्यामुळे अमेरिकेने इराणला इशारा देण्यासाठी ही तैनाती केल्याचा दावा केला जातो.

‘बंकर बस्टर’ओमानच्या आखातातून इंधनाचा साठा असलेले ‘ॲडवांटेज स्विट्स’ टँकर जहाज अमेरिकेच्या ह्युस्टन बंदरासाठी रवाना झाले होते. या जहाजावर २९ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. रेड सी, भूमध्य समुद्राच्या वाटेने सदर जहाज प्रवास करणार होते. पण ओमानच्या आखातात असतानाच इराणच्या नौदलाने हेलिकॉप्टर या जहाजावर उतरवून त्याचा ताबा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून हे जहाज इराणच्या ताब्यात आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणच्या इंधनवाहू जहाजावर कारवाई केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी इराणने अमेरिकन जहाजावर ही कारवाई केल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या जहाजाने आपल्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्यामुळे ही कारवाई केल्याचा खुलासा इराणने दिला आहे. मात्र आपले जहाज आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात असताना इराणने कारवाई केल्याचा आरोप करून तसेच इराणने आपले जहाज तत्काळ सोडावे, असे अमेरिकेने बजावले होते.

या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच, अमेरिकेने आखातासाठी ए-१० वॉरथॉग्स विमाने रवाना केल्याची बातमी समोर आली. लांब पल्ल्यावरील हवाई कारवाईसाठी या विमानांचा वापर केला जातो. पण पहिल्यांदाच ही विमान ‘जीबीयू-३९/बी’ या गायडेड बंकर बस्टर्स बॉम्बनी सज्ज करण्यात आली आहे. ११३ किलो वजनाचा हा बॉम्ब शत्रूच्या छुप्या, भुयारी ठिकाणांना अचूकरित्या लक्ष्य करू शकतो. हे लक्षात घेऊन या विमानाची तैनाती झाल्याचे हवाईदलाच्या सिरिया ऑपरेशन्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ॲलेक्सस ग्रिन्केविच यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने हवाईदलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. पण सदर विमानांची आखातातील तैनाती इराणविरोधात असल्याचे स्पष्टपणे या वर्तमानपत्राने आपल्या बातमीत म्हटलेले नाही. पण इराणने अमेरिकेचा ऑईल टँकर घेतल्यानंतर सदर विमानांच्या तैनातीची घोषणा झाली. त्यामुळे बंकर बस्टर्सनी सज्ज असलेल्या विमानांची तैनाती इराणविरोधातच असल्याचा निष्कर्ष काढता येईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये इराणने लढाऊ विमाने, ड्रोन्सची तैनाती तसेच क्षेपणास्त्रांचा साठा करणारे छुपे तळ विकसित केले आहेत. इराणने सरकारी वृत्तवाहिनीच्या सहाय्याने या भुयारी छुप्या तळांची माहिती उघड केली होती. इराणच्या याच भुयारी तळांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टर्स बॉम्बर विमानांची तैनाती केल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply