कैरो – संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला प्रस्ताव स्वीकारून सुदानमधील लष्कर आणि निमलष्करीदल ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीसाठी तयार झाले. पण ही संघर्षबंदी फार काळ टिकणार नसल्याचा विश्लेषकांचा दावा पुढच्या काही तासातच खरा ठरला. राजधानी खार्तूमवर हवाई हल्ले झाले असून या देशातील परिस्थिती अतिशय बिकट बनल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांनी म्हटले आहे.
सुदानमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेले गृहयुद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुन्हा पुढाकार घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेले निरीक्षक वोल्कर पर्थेस यांनी सुदानी तसेच परदेशी जनतेच्या सुरक्षेसाठी लष्कर व निमलष्करीदलाकडे अतिरिक्त संघर्षबंदीची मागणी केली. या गृहयुद्धामुळे संकटात सापडलेल्या सुदानच्या जनतेसाठी स्थिर आणि विश्वासार्ह संघर्षबंदीची आवश्यकता असल्याचे पर्थेस म्हणाले. सुदानी जनतेपर्यंत मानवतावादी सहाय्य पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे पर्थेस यांनी स्पष्ट केले.
त्यानुसार सुदानचे लष्कर आणि निमलष्करदल ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीसाठी तयार झाले. या काळात सुदानमधील बचावकार्याबरोबरच मानवतावादी सहाय्य पोहोचविण्यासाठी सहाय्य करणार असल्याचे दोन्ही गटांनी मान्य केले. पण यासंबंधीची माहिती प्रसिद्ध होऊन काही मिनिटेही उलटत नाही तोच खार्तूम व इतर भागात जोरदार हवाई हल्ले झाले. संघर्षबंदीच्या या उल्लंघनासाठी सुदानमधील दोन्ही गट एकमेकांवर आरोप करीत आहे.
दरम्यान, सुदानमधील संघर्षात ५०० हून अधिक जणांचा बळी गेला तर ४५०० जण जखमी झाले. हे गृहयुद्ध सुदानपर्यंत मर्यादित नसून शेजारी आफ्रिकी देश तसेच आंतरराष्ट्रीय समुदायासाठी हा संघर्ष धोकादायक ठरू शकतो, असा इशारा पाश्चिमात्य विश्लेषकांनी याआधी दिला होता. अमेरिका व सौदी अरेबिया लवकरच सुदानमधील दोन्ही गटांना संघर्षबंदीचा नवा प्रस्ताव देणार आहेत.
हिंदी