मॉस्को – ‘क्रेमलिनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता रशियासमोर इतर कोणताही पर्याय राहिलेला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व त्यांच्या कंपूला कायमचे संपविण्याची वेळ आली आहे’, असा खरमरीत इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. तर रशियन संसदेचे सभापती व्याचेस्लाव्ह वोलोदिन यांनी युक्रेनची राजवट नष्ट करण्याची क्षमता असलेल्या शस्त्रांचा वापर करायला हवा, अशी मागणी केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना संपविण्यासाठी युक्रेनने बुधवारी ‘क्रेमलिन’वर ड्रोन हल्ला चढविला होता, असा दावा रशियाने केला होता. रशियन दलांनी हा हल्ला हाणून पाडला असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे रशियाने सांगितले होते. मात्र या हल्ल्यावर रशियाच्या राजकीय वर्तुळातून तसेच माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष व सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख असणाऱ्या मेदवेदव्ह यांचे वक्यव्य त्याचाच भाग ठरते.
बुधवारी युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनद्वारे केलेला हल्ला रशियन राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करण्यासाठीच होता व हा दहशतवादी हल्ला ठरतो, असे घणाघाती आरोप रशियाच्या प्रवक्त्यांनी केला होता. सदर हल्ल्याची योजना किव्हमध्ये नाही तर वॉशिंग्टनमध्ये तयार झाल्याचा दावाही रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला होता. मात्र युक्रेन व अमेरिकेने हे दावे फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशियाच्या आरोपांवर संशय व्यक्त केला आहे. तर हल्ल्याशी युक्रेनचा काहीही संबंध नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, क्रेमलिनवर झालेल्या ड्रोनहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की फिनलँडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युद्धगुन्ह्यांबाबत कडक शिक्षा मिळायला हवी, अशी आक्रमक मागणी केली.
हिंदी