इस्रायलने चीनच्या कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहावे

- अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी

जेरूसलेम – ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी पावले उचलणाऱ्या इस्रायलने वेळीच सावध व्हावे. इस्रायलच्या पायाभूत सुविधांमधील चीनची गुंतवणूक इस्रायलसाठी तसेच इस्रायली तंत्रज्ञानातील संशोधनासाठी धोका ठरू शकते. चीन इस्रायलचे तंत्रज्ञान, संशोधनाची चोरी करू शकतो’, असा इशारा अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी यांनी दिला. त्याचबरोबर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहावर असेपर्यंत इस्रायलच्या सुरक्षेसाठी आवश्यक फंडींग सुरू राहणार असल्याची घोषणा मॅक्कार्थी यांनी केली.

इस्रायलने चीनच्या कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहावे - अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी1998 साली न्यूट गिंगरीच यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती म्हणून इस्रायलचा दौरा करून इस्रायली संसदेला संबोधित केले होते. त्यानंतर अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापतींनी इस्रायली संसदेला भेट दिली नव्हती. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच अमेरिकन सभापती म्हणून मॅक्कार्थी यांनी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी इराण व चीनपासून इस्रायलच्या सुरक्षेला असलेला धोका मॅक्कार्थी यांनी अधोरेखित केला.

‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून आपल्या संशोधनांना नवा धोका निर्माण झाला आहे. आपण प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनाचे पुरस्कर्ते आहोत, असा आभास चीन निर्माण करीत आहे. पण खऱ्या अर्थाने चीनच्या कारवाया चोरासारख्या आहेत. चीनने आपल्या तंत्रज्ञानाची चोरी करू नये, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे’, असे मॅक्कार्थी इस्रायली संसदेतील आपल्या भाषणात म्हणाले.

इस्रायलने चीनच्या कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहावे - अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी2019 साली इस्रायलने परदेशी गुंतवणूकीची तपासणी करण्याचे धोरण स्वीकारले होते, याची तारीफ मॅक्कार्थी यांनी केली. पण इस्रायलने परदेशी गुंतवणूक, त्यातही चीनच्या गुंतवणुकीबाबत अधिक कठोर आणि सखोल चौकशी, तपास करावा, असे आवाहन मॅक्कार्थी यांनी केले. त्याचबरोबर इराण आणि चीनच्या धोक्याविरोधात अमेरिकेकडून इस्रायलला असलेले समर्थन यापुढेही कायम राहणार असल्याची घोषणा मॅक्कार्थी यांनी केली. अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापतीपदावर आपण असेपर्यंत इस्रायलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे फंडींग कधीच थांबणार नसल्याची ग्वाही मॅक्कार्थी यांनी दिली. मॅक्कार्थी यांच्या या इस्रायल दौऱ्यावर बायडेन समर्थकांकडून टीका सुरू झाली आहे.

हिंदी English

 

leave a reply