उत्तर कोरियाच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन दक्षिण कोरिया अमेरिकेसह सर्वात मोठा युद्धसराव आयोजित करणार

सेऊल – येत्या महिनाअखेरीस अमेरिकेबरोबरील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या युद्धसरावाचे आयोजन करणार असल्याची घोषणा दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने केली. यामध्ये एफ-३५ए स्टेल्थ लढाऊ विमानांबरोबर, अपाचे हेलिकॉप्टर्स व मल्टिपल रॉकेट लाँचर्सचाही वापर केला जाईल, अशी माहिती दक्षिण कोरियाने दिली. दक्षिण कोरिया अधिकाधिक अमेरिकाधार्जिणी भूमिका स्वीकारीत चालला आहे. असेच सुरू राहिले तर याचे गंभीर परिणाम दक्षिण कोरियाला भोगावे लागतील, अशी धमकी उत्तर कोरियाने काही तासांपूर्वी दिली होती. पण दक्षिण कोरियाने याकडे दुर्लक्ष करुन अमेरिकेबरोबरच्या लष्करी सहाय्याला अधिक महत्त्व दिले आहे.

उत्तर कोरियाच्या धमकीकडे दुर्लक्ष करुन दक्षिण कोरिया अमेरिकेसह सर्वात मोठा युद्धसराव आयोजित करणारगेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊन राष्ट्राध्यक्ष येओल यांनी उत्तर कोरियाविरोधी धोरणांवर चर्चा केली होती. यावेळी अमेरिकेने दक्षिण कोरियात आण्विक पाणबुडी तैनात करण्याची घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या या अमेरिका दौऱ्याला लक्ष्य करुन उत्तर कोरियाने नवी धमकी दिली.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकाधार्जिणी भूमिका स्वीकारत असल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला आहे. राष्ट्राध्यक्ष येओल हे अधिकाधिक कट्टरपंथी बनत चालले असून ते आपल्याच देशाच्या आणि जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला होता. ‘राष्ट्राध्यक्ष येओल यांनी उत्तर कोरियाविरोधी भूमिका स्वीकारणे सुरू ठेवले तर त्याचे गंभीर आर्थिक आणि लष्करी परिणाम संभवतील. राष्ट्राध्यक्ष येओल आणि त्यांच्या देशासाठी हे दु:स्वप्न ठरेल’, असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता.

उत्तर कोरियाची ही धमकी प्रसिद्ध होऊन काही तास उलटत नाही तोच दक्षिण कोरियाने अमेरिकेबरोबरच्या युद्धसरावाची घोषणा केली. अमेरिका व दक्षिण कोरियातील ७० वर्षांपासूनच्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, हा युद्धसराव आयोजित करण्यात येत आहे. २५ मे रोजी सुरू होणारा हा युद्धसराव १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. दक्षिण कोरियन राजधानी सेऊलपासून अवघ्या ५२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सेऊंगजीन फायर ट्रेनिंग फिल्डमध्ये या लाईव्ह फायर सरावाचे आयोजन केले जाणार आहे. सदर युद्धसराव उत्तर कोरियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्याचा दावा केला जातो.

leave a reply