कोरोनाव्हायरसच्या जगभरातील बळींची संख्या ५० हजारावर

माद्रिद/वॉशिंग्टन – जगभरात हाहाकार माजविणार्‍या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत ५०,००० हून अधिक जणांचा बळी घेतला. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या १० लाखाच्याजवळ पोहोचली आहे. जगभरातील एकूण बळींपैकी दोन तृतियांश बळी इटली, स्पेन, अमेरिका आणि फ्रान्स या विकसित देशांमधील आहेत. तर गेल्या दोन दिवसात दहा हजार जण या साथीने दगावले आहेत.

लवकरच स्पेन युरोपमधील कोरोनाव्हायरसच्या साथीचे मुख्यकेंद्र ठरेल, असा इशारा स्पेनमधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिला होता. गेल्या दोन दिवसात हा इशारा प्रत्यक्षात उतरू लागल्याचे दिसत आहेत. गेल्या चोवीस तासात स्पेनमध्ये ९५० जणांचा बळी गेला असून इटलीपाठोपाठ स्पेनने देखील दहा हजार बळींची संख्या ओलांडली आहे. स्पेनमध्ये एका दिवसात कोरोनाव्हायरसचे ८,१०२ नवे रुग्ण आढळले आहेत.

तर गेल्या आठवड्याभरात पहिल्यांदाच इटलीमध्ये एका दिवसात दगावलेल्याची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये ७२७ जणांचा बळी गेला असून या देशातील नव्या रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याचा दावा येथील माध्यमे करीत आहेत. इटलीचे सरकार देखील या साथीची लागण झालेल्यांची संख्या घसरत असल्याचे सांगत आहेत. मात्र, सरकार जाहीर करीत असलेली आकडेवारी आणि देशातील परीस्थिती यात खूप मोठी तफावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

फ्रान्समध्ये चार हजाराहून अधिक जणांचा बळी गेला असून गेल्या चोवीस तासात या देशात या साथीमुळे ५०९ जण दगावाले. तर सहा हजाराहून अधिक रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती येथील माध्यमांनी दिली. या साथीने गेल्या चोवीस तासात अमेरिकेत ७५० जणांचा बळी घेतला. याबरोबर अमेरिकेत एकूण ५,१४५ जणांनी या साथीमुळे जीव गमावले. किमान नऊ हजार जण या साथीतून बरे झाल्याचे अमेरिकी आरोग्य यंत्राणांनी म्हटले आहे. या साथीमुळे अमेरिकेतील बेरोजगारी वाढल्याचे सरकारी माहितीतून समोर आले आहे.

दरम्यान, युरोपमधील बहुतांश देशांनी लॉकडाउन जाहीर करुन आपल्या जनतेला सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले होते. पण वारंवार केलेल्या आवाहनानंतर जनता नियमांचे पालन करीत नसल्याची हताश प्रतिक्रिया युरोपिय देशांचे सरकार देत आहे. यासाठी ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांनी लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोन्सची गस्त सुरू केली आहे. तर स्पेनने मोबाईल फोन ट्रॅकींगचा वापर करुन चार हजार जणांवर कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

leave a reply