अमेरिकेत कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक बळी व रुग्ण

बळींची संख्या १८,८७० व रुग्ण पाच लाखांच्या वर

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेत २१०८ जणांचा बळी गेला आहे. तर अमेरिकेत या साथीने एकूण १८,८७० जण दगावले असून जगभरात कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक बळी गेलेला देश, अशी अमेरिकेची नोंद झाली आह्व. अमेरिकेचे न्यूयॉर्क कोरोनाव्हायरसचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले आहे. अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची संख्या पाच लाखाच्याही पुढे गेली आहे. असे असले तरी, या साथीच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची माहिती संकलित करणार्‍या ‘जॉन हॉप्किन्स विद्यापीठा’ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अमेरिकेत चोवीस तासातील सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. या साथीने एकाच दिवसात २१०८ जण दगावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या विद्यापीठाने म्हटले आहे. याबरोबर अमेरिकेतील एकूण बळींची संख्या देखील सर्वाधिक झाली आहे. तर अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या पाच लाखांच्या वर पोहोचली आहे.

न्यूयॉर्क प्रांत अमेरिकेतील या साथीचे मुख्यकेंद्र ठरले आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे न्यूयॉर्कमध्ये ७७७ जण दगावले असून या प्रांतात आत्तापर्यंत ७८०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यापैकी न्यूजर्सीमध्येच दोन हजार जण दगावल्याचा दावा केला जातो. या प्रांतात सदर साथीचे १,७०,००० रुग्ण असून इटली व स्पेन या देशांपेक्षाही ही संख्या मोठी आहे.

न्यूयॉर्कमध्ये कोरोनाव्हायरसच्या बेवारस मृतदेहांची संख्या वाढत आहे. गेले तीन दिवस पंचवीस बेवारस मृतदेहांना आरोग्य विभागाकडून दफन केले जात आहे. या मृतदेहांना दफन करण्यासाठी बंद पडलेल्या कारखान्याच्या आवाराचा वापर केला जात आहे.

leave a reply