कोरोनाप्रतिबंधक लसीच्या विकासात भारत मोठे योगदान देईल

- इंटरनॅशनल वॅक्सिन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांचा विश्वास

सेऊल/लंडन – कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील आघाडीच्या औषध कंपन्या यासाठी झटत आहेत. असे असले तरी, येत्या काळात ही लस तयार करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा ‘इंटरनॅशनल वॅक्सिन इन्स्टिट्यूट’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख डॉ. जेरॉम किम यांनी केला. त्याचवेळी भारतातील दोन बड्या कंपन्यांनी यासाठी सुरू केलेले प्रयत्न ‘प्री-क्लिनिकल’ टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

जगभरातील लसीकरण मोहिमांसाठी वापरण्यात येणार्‍या जवळपास ७० टक्के लसी ह्या भारतातून निर्यात केल्या जातात. “जगातील जवळपास प्रत्येक मुलाला देण्यात येणारी लस ही ‘मेड इन इंडिया’ असते”, असे डॉ. किम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. एकदा का या साथीवर लस मिळाली तर जागतिक मागण्यांची पुर्तता करण्यासाठी भारतीय कंपन्यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल, असा दावा डॉ. किम यांनी केला. भारतीय विद्यापीठे आणि आयटी क्षेत्र या साथीवर तोडगा शोधू शकतील, असा विश्वास डॉ. किम यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘जागतिक आरोग्य संघटना’ने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ६० कंपन्यांनी कोरोनाव्हायरसवरील लस तयार करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामध्ये भारताच्या ‘झायडस कॅडिला’ आणि ‘भारत बायोटेक’ या दोन कंपन्यांचाही समावेश असल्याची माहिती डब्ल्यूएचओने दिली. या व्यतिरिक्त भारतातील दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी अमेरिकी आणि ऑस्ट्रेलियन कंपनीशी सहकार्य करुन यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू केल्याची माहितीही समोर येत आहे.

leave a reply