कोरोनाच्या साथीमागे चीनचा कट असल्यास परिणाम भोगावे लागतील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरस चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून जगभरात पसरला, हे ठासून सांगणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला नवा सज्जड इशारा दिला आहे. जगभरात हजारो जणांचा बळी घेणारी ही साथ चीनने जाणीवपूर्वक पेरलेली असेल, तर त्याचे भयंकर परिणाम चीनला सहन करावे लागतील, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी देखील कोरोनाव्हायरसच्या साथीची सखोल चौकशी व्हावी व याचा जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध असता कामा नये, अशी मागणी करून चीनवरील दडपण अधिकच वाढले आहे.

‘चीनने जर हेतूपुरस्सर या साथीचा फैलाव केला असेल, तर त्यांना याची किंमत मोजावीच लागेल. ही चूक जरी असली तरी चीनने हे जाणूनबूजून केले का, याचाही शोध घेतला जाईल’, असे सांगून या प्रकरणातून चीनची सुटका नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर वुहानमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चीनला कळून चुकले होते. म्हणून चीनने या साथीच्या चौकशीसाठी अमेरिकी अधिकाऱ्यांना वुहानमध्ये प्रवेश देण्याचे नाकारले. पण आता अमेरिकेने या प्रकरणाची चौकशी हाती घेतल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले.

त्याचबरोबर या साथीमुळे चीनमध्ये इतक्या कमी प्रमाणात बळी गेले, यावर विश्वास ठेवता येणार नसल्याचे सांगून ट्रम्प यांनी चीन करीत असलेल्या दाव्यांवर अविश्वास दाखवला. ‘चीनमध्ये कोरोनाव्हायरसने किती बळी गेले, हे मलाही ठाऊक आहे, चीनलाही ठाऊक आहे आणि माध्यमांनाही माहिती आहे. तरी माध्यमांनी चीनच्या या लपवाछपवीची माहिती दिली नाही’, अशी तक्रार ट्रम्प यांनी केली.

कोरोनाव्हायरस आणि या साथीचा स्त्रोत जाणून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनच्या (डब्ल्यूएचओ) अहवालावर भरवसा ठेवता येणार नसल्याची टीका ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मेरी पेन यांनी केली. यासाठी आंतरराष्ट्रीय समितीकडून स्वतंत्र चौकशीची आवश्यकता असल्याचे परराष्ट्रमंत्री पेन म्हणाल्या.

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे, गेल्या काही दिवसांपासून स्पष्टपणे दिसू लागले आहे. याच्या काही काळ आधी चीनच्या सरकारी माध्यमांनी हा विषाणू अमेरिकेने आपल्या देशात पेरलाचे दावे ठोकून दिले होते. अमेरिकेने चीनविरोधात जैविक युद्ध पुकारून कोरोनाव्हायरस तयार केला आणि त्याचे खापर चीनवर फोडले, हे चिनी माध्यमांनी केलेले दावे अमेरिकेने अत्यंत गांभीर्याने घेतले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी याप्रकरणी चीनकडे खुलासाही मागितला होता. मात्र चीनने अधिकृत पातळीवर ही भूमिका घेण्याचे टाळले होते.

असे असले तरी, कोरोनाव्हायरस या साथीबाबत आपला बचाव करण्यासाठी वेगवेगळे मार्ग धुंडाळीत असल्याची बाब यामुळे जगासमोर आली होती. कोरोनाव्हायरसमुळे जबर हानी सहन करणारे सारे देश याप्रकरणी चीनवर विश्वास ठेवून चीनने केलेले दावे स्वीकारण्यास तयार नसल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दरदिवशी चीनला याची परखड जाणीव करून देत आहेत.

leave a reply