देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्ण संख्येने १६ हजाराचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) – गेल्या चोवीस तासात देशातील कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या 31 ने वाढून 519 वर पोहोचली असून  रुग्णांची संख्या 1334 ने वाढून 16 हजाराच्या पुढे गेली आहे.  मात्र अजूनही देशाने सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे याबाबत व्यक्त केली जाणारी भीती निराधार आहे, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. तसेच काही जणांनी बेजबाबदारपणा दाखवला नसता, तर कोरोनाव्हायरस विरोधातील या लढाईत भारत आतापर्यंत विजयाच्या टप्प्याजवळ पोहोचला असता, असा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला.

 शनिवारपासून रविवार सायंकाळापर्यंतच्या चोवीस तासात देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 1334 वाढली. देशात या साथीच्या रुग्णांची संख्या 16,116 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2301 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फ़े देण्यात आली. महाराष्ट्रात ४,२२७,  दिल्लीत २००८, गुजरातमध्ये १७५६, तामिळनाडूत १७५२, राज्यस्थानात १५४५ कोरोनाचे रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. या सहा राज्यातच देशातील ७० टक्के  रुग्ण सापडले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. गोव्यात आढळलेले सातही रुग्ण बरे झाले असून सध्या एकही कोरोनाचे रुग्ण नसलेले गोवा देशातील पहिले राज्य ठरले असल्याचा दावा करण्यात आहे. 
देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी 755 विशेष रुग्णालये उभारण्यात आली आहेत. याशिवाय 1,389 हेल्थ केअर सेंटर्स सध्या कार्यरत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  देशात कोरोनाव्हायरसच्या  चाचणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शनिवारी एकाच दिवसात 37,173 चाचण्या करण्यात आल्या. यातील 29,287 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये पार पडल्या. आतापर्यंत देशात 3 लाख 86 हजार 791 चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’तर्फ़े (आयसीएमआर) देण्यात आली.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना या आरोग्य पथकांना पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चाचण्यांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करण्यात यावेत. पथकांमध्ये स्थनिक नेते, शांती समितीच्या सदस्यांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश राज्यांना दिले आहेत.
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने या आधी जाहीर केलेल्या नियमावली नुसार देशातील कोरोनामुक्त क्षेत्रांमध्ये कारखाने, उत्पादन युनिट व इतर महत्वाची कामे सुरू होत आहेत. पण परिस्थितीचा संपूर्ण अंदाज घेऊनच राज्य सरकारांनी लॉकडाऊनमध्ये सवलत द्यावी असे गृह मंत्रालयाने पुन्हा एकदा बजावले आहे. तसेच इ-कॉमर्स कंपन्यांना  आपला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी असली, तरी केवळ जीवनावश्यक मालच विकण्याची व तो पोहचविण्याची परवानगी असल्याचे, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

leave a reply